Stock Market Closing Bell | शेअर बाजारात बेअर अटॅक! सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला, गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी उडाले | पुढारी

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात बेअर अटॅक! सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी घसरला, गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी उडाले

पुढारी ऑनलाईन : ताज्या आर्थिक आकडेवारीने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबद्दल चिंता वाढली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी घसरून ६४,९०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात १९,४०० च्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स २८६ अंकांच्या घसरणीसह ६५,२२६ वर स्थिरावला. तर निफ्टी ९२ अंकांनी घसरून १९,४३६ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.५ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्क्याने घसरला.

आजच्या घसरणीमुळे बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.२३ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३१५.९८ लाख कोटी रुपयांवर आले. (Stock Market Closing Bell) आज क्षेत्रीयमध्ये पीएसयू बँक आणि रियल्टी टॉप लूजर्स राहिले.

संबंधित बातम्या 

दरम्यान, ८३.२० च्या आधीच्या बंदच्या तुलनेत आज भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.२३ वर बंद झाला.

सेन्सेक्स आज ६५,३३० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,८७८ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकेचा शेअर सर्वाधिक ३.६६ टक्क्यांनी घसरून १,००१ रुपयांवर आला. तर इंडसइंड बँकेचा शेअर २.५८ टक्क्यांनी घसरून ५८७ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुती हे शेअर्सही २ ते २.५० टक्क्यांनी घसरले. बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, बजाज फायनान्स, एलटी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टायटन, एम अँड एम, टेक महिंद्रा, आयटीसी या शेअर्सनीही लाल चिन्हात व्यवहार केला. दरम्यान, नेस्ले इंडियाचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर सुमारे ३ टक्के वाढून २३ हजारांवर पोहोचला. हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस हे शेअर्सही वाढले.

निफ्टीवर ॲक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट हे सर्वाधिक घसरले, तर अदानी एंटरप्रायझेस, नेस्ले इंडिया, एचयूएल, आयशर मोटर्स आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स वाढले.

जागतिक बाजारातील स्थिती काय?

आशियाई बाजारात बुधवारी ११ महिन्यांतील निच्चांकी घसरण दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २.३ टक्क्यांनी घसरला. तर हाँगकाँगचा हँग सेंग ०.९ टक्क्यांनी खाली आला. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी देखील २.३ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, मंगळवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १.३ टक्क्यांनी घसरला. तर ब्रॉड-बेस्ड एस अँड पी ५०० ( S&P 500) निर्देशांक १.४ टक्क्यांनी आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite Index) १.९ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या दहा सत्रांत निव्वळ विक्री केली आहे. त्यांनी मंगळवारी २,०३४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) निव्वळ आधारावर १,३६१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button