Stock Market | अर्थवार्ता- निफ्टीमधील ५० पैकी ‘या’ ४८ समभागांत वाढ | पुढारी

Stock Market | अर्थवार्ता- निफ्टीमधील ५० पैकी 'या' ४८ समभागांत वाढ

* आर्थिक वर्ष 2023-24 सालच्या शेवटच्या सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 230.15 अंक व 819.41 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 22326.9 अंक व 73651.35 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये सप्ताहात एकूण 1.04 टक्के व सेन्सेक्समध्ये एकूण 1.13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये बजाज फायनान्स (7.9 टक्के), अदानी पोर्टस (6.3 टक्के), मारुती सुझुकी (5.8 टक्के), लार्सन टुब्रो (5.7 टक्के), टायटन कंपनी (4.8 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला तसेच सप्ताहादरम्यान सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये एल अँड टी माईंड ट्री (-4.3 टक्के), विप्रो (-4.1 टक्के), इन्फोसिस (-3.6 टक्के), टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट (-3.3 टक्के), एचसीएल टेक (-3.3 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.

गतसप्ताहात आर्थिक वर्ष 2023-24 सालचा शेवट झाला. एकूण संपूर्ण आर्थिक वर्षचा विचार करता, निफ्टीने एकूण 4967.15 अंक म्हणजेच 28.61 टक्क्यांची तर सेन्सेक्स निर्देशांकाने एकूण 14659.83 अंकांची म्हणजेच 24.85 टक्क्यांची वाढ दर्शवली. निफ्टीमधील एकूण 50 समभागांपैकी 48 समभागांनी आर्थिक वर्षात वाढ दर्शवली. निफ्टीमधील मिडकॅप निर्देशांक सुमारे 60 टक्के तर स्मॉल कॅप, निर्देशांकाने 70 टक्क्यांची वाढ नोंदवली. मागील 3 आर्थिक वर्षांमधील ही सर्वाधिक वाढ आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या लार्ज कॅप समभागांमध्ये बजाज ऑटो (136 टक्के), टाटा मोटर्स (133 टक्के), अदानी पोर्टस (109 टक्के), कोल इंडिया (101 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. भांडवल बाजारमूल्यानुसार (मार्केट कॅप) टाटा उद्योग समूह 30 लाख 20 हजार कोटींच्या भांडवल बाजारमूल्यासह देशातील सर्वात मोठा उद्योग समूह गणला गेला. बॉम्बे स्टॉम एक्स्चेंज (बीएसई) एकूण भांडवल बाजारमूल्य आर्थिक वर्षांत 262 लाख कोटींवरून तब्बल 394 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

* 28 मार्चपासून टी+0 सेटलमेंटला भारतीय भांडवल बाजारात सुरुवात. समभागांची विक्री केल्यावर किंवा व्यवहारपूर्ण केल्यावर व्यवहार केलेल्या दिवशीच समभागांची सेटलमेंट केली जाणार. म्हणजेच समभाग विक्री केल्यावर पैसे येण्यासाठी एक दिवसाची वाट पाहायला लागत होती. यालाच ‘टी+1’ सेटलमेंट म्हटले जाते; परंतु आता ही सेटमेंट त्याच दिवशी पूर्ण केली जाणार. ‘टी+0’ प्रणालीअंतर्गत बाजारात दुपारी 1.30 पर्यंत व्यवहार केल्यास 4.30 पर्यंत त्यांच्या खात्यात समभागांचा पैसा जमा होईल. सध्या बाजारातील एकूण निफ्टीच्या 10 समभागांसह 25 समभागांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे सेटलमेंट केले जाईल. याचा पुढील 3 महिने व 6 महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर येणार्‍या अडचणी दूर करून संपूर्ण भांडवल बाजारासाठी ही पद्धत लागू करण्यात येईल. सध्या या प्रकारे व्यवहार झाल्या दिवशीच त्याची पूर्तता करण्याची क्षमता असलेला (T+O Settlment) भारत, चीन नंतर जगातील दुसरा देश ठरला आहे.

* अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स रिटेलर्स कंपन्यांना लवकरच सरकारी गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस म्हणजेच जेम (GEM) पोर्टलकडून स्पर्धा तयार होणार. सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे. आतापर्यंत कोणताही पात्र उद्योजक जेम प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सरकारी विभागाला वस्तू किंवा सेवा विकू शकत होता; परंतु आता सर्वसामान्य नागरिकदेखील या पोर्टलवरून अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टप्रमाणे खरेदी करू शकेल. आतापर्यंत केवळ सरकारी विभागांशी निगडित असूनदेखील 2017 ला अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत जेम पोर्टलवर 2.1 कोटी व्यवहार झाले आहेत. व्यवहाराचे मूल्य 7.9 लाख कोटींवर पोहोचले आहे.

* अंबुजा सिमेंटचे प्रवर्तक अंदानी कुटुंबाने कंपनीमध्ये 6661 कोटींची अधिकची (Additional) गुंतवणूक केली. यामुळे त्यांचा कंपनीमधील हिस्सा 3.6 टक्क्यांनी वाढून 66.7 टक्क्यांवर पोहोचला. 2028 पर्यंत अंबुजा सिमेंटची क्षमता 140 दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्पादनापर्यंत वाढवण्याचा अदानींचा प्रयत्न आहे. यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये अदानींनी 5 हजार कोटींची गुंतवणूक कंपनीस केली होती. सध्या अदानी समूहाची सिमेंट उत्पादन क्षमता 77.4 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी आहे.

* देशातील गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा तेजीत येत असल्याचे संकेत गत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सात महानगरांमध्ये 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक घरांची विक्री झाली. गृहविक्रीमध्ये वर्षभरात सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली. यामध्ये पुणे आणि मुंबई या महानगरांचा एकूण वाटा 51 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईमध्ये गृहविक्रीत 24 टक्के, तर पुण्यामध्ये गृहविक्रीत 15 टक्क्यांची वाढ झाली.

* जीएसटी विभागाने जानेवारी 2024 पर्यंत एकूण 19690 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिचा फायदा घेतल्याची प्रकरणे पकडली. वस्तू किंवा सेवा देताना येणार्‍या कच्च्या मालाच्या खर्चासाठी पावत्या दाखवल्यास जीएसमध्ये सवलत मिळते; परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे आढळले. एकूण 1940 प्रकरणे आतापर्यंत सापडली आहेत. पश्चिम बंगाल व गुजरात या भागातून सर्वाधिक किमतीची बनावट आणि करचुकवेगिरीची प्रकरणे आढळली आहेत.

* एस अँड पी ग्लोबल पावत्या या पतमानांकन संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धीदराचे उद्दिष्ट/अंदाज वाढवला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.8 टक्के दराने वाढेल. असा अंदाज वर्तवला. यापूर्वी हा अंदाज दर 6.4 टक्के होता. भारताच्या सांख्यिकी विभागाने हा वृद्धीदर अंदाज 7.6 टक्के इतका वर्तवला आहे.

* आर्थिक वर्ष 2023-24 सालामध्ये भारताचे चलन आशियामधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक स्थिर चलन ठरले. हाँगकाँग डॉलर आणि सिंगापूरचा डॉलर यांच्यानंतर रुपायाने आशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. या वर्षात रुपाया डॉलरच्या तुलनेत 1.5 टक्के घसरला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये स्थानिक बाजारात 3.23 लाख कोटींचा निधी गुंतवला (influws) गेला आणि 45.36 हजार कोटींचा निधी बाहेर (Outflows) पडला. वर्षादरम्यान महागाई दर 2 ते 6 टक्क्यांदरम्यान राहिला. तसेच रिझर्व्ह बँकेने देशातील व्याजदर (रेपोरेट) 6.50 टक्क्यांवर कायम ठेवले. या सर्वांचा परिणाम रुपाया चलन इतर चलनांच्या तुलनेत स्थिर राहण्यात झाला.

* सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेली ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनी महाराष्ट्रात पुढील पाच वर्षांत 5 हजार कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प उभारणार. सेमीकंडक्टर चीप्स बनवण्याचा प्रकल्प उभारण्याचे या कपंनीचे प्रयोजन आहे. नवी मुंबईत सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध वैज्ञानिक अनिल काकोडकर आणि कंपनीचे सीईओ राजेंद्र चोडणकर यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

* शापूरजी पालनजी समूहाची कंपनी ‘अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ने 7 हजार कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला. यामध्ये 1250 कोटींचे नवे समभाग असतील. तसेच गोस्वामी इन्फ्राटेकचे 5750 कोटींचे ऑफर फॉर सेल (जऋड) चे समभाग असतील.

* 22 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी (Forex Reserve) आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. सलग पाचव्या सप्ताहात वाढ दर्शवून 6.396 अब्ज डॉलर्सच्या वाढीसह गंगाजळी 642.63 अब्ज डॉलर्स झाली. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये गंगाजळी या विक्रमी पातळीजवळ होती. तब्बल अडीच वर्षांनी गंगाजळीने हा विक्रमी टप्पा पुन्हा गाठला.

Back to top button