Stock Market Closing ‍‍Bell | RBI MPCच्या निर्णयानंतर बाजारात चौफेर विक्री! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing ‍‍Bell | RBI MPCच्या निर्णयानंतर बाजारात चौफेर विक्री! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI MPC) रेपो दर जैसे थे ठेवल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारी शेअर बाजारात चौफेर विक्रीचा मारा दिसून आला. यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी घसरण झाली होती तर निफ्टी २१,७०० च्या खाली घसरला. विशेषतः खासगी बँकिंग शेअर्समध्ये अधिक घसरण झाली. त्यानंतर सेन्सेक्स ७२३ अंकांच्या घसरणीसह ७१,४२८ वर बंद झाला. तर निफ्टी २१२ अंकांनी घसरून २१,७१७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण सुमारे १ टक्के होती. (Stock Market Closing ‍‍Bell)

क्षेत्रीय पातळीवर ऑटो, बँक, रियल्टी, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी ०.५-२ टक्क्यांनी घसरले. तर ऑईल आणि गॅस, पॉवर, आयटी आणि पीएसयू बँक ०.३-२ टक्क्यांनी वाढले.

संबंधित बातम्या 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतविषयक धोरण समितीने (MPC) सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी (दि. ८) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी जाहीर केला. आरबीआयच्या निर्णयापूर्वी शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली होती. पण आरबीआयच्या निर्णयानंतर बाजारात विक्रीचा दबाव राहिला.

सेन्सेक्स आज ७२,४७३ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७१,३०० च्या खाली येऊन व्यवहार केला. सेन्सेक्सवर आयटीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एम अँड एम, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील हे टॉप लूजर्स होते. तर एसबीआय, पॉवर ग्रिड, टीसीएस, एचसीएल टेक हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर ब्रिटानिया, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, आयशर मोटर्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले. तर एसबीआय, पॉवर ग्रिड, बीपीसीएल, हिंदाल्को, कोल इंडिया हे टॉप गेनर्स होते.

आरबीआयने व्याजदर कपातीचे कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँक सारख्या खासगी बँकिंग शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली. तर PSU बँकांनी तेजीत व्यवहार केला.

दीर्घकालीन गुंतवणूकदार ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (BAT) ने शेअरहोल्डिंगच्या कमाईसाठी आणि त्याच्या ताळेबंदाला चालना देण्यासाठी काही हिस्सेदारी विकण्याचे संकेत दिल्यानंतर ITC चे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. (ITC Share Price)

Paytm ला पुन्हा फटका

पेटीएम चालवणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समधील दोन दिवसांतील तेजी आज पुन्हा संपुष्टात आली. आजच्या ट्रेड्रिंग सत्रात हा शेअर्स सुमारे ९ टक्क्यांनी घसरून बीएसईवर ४५० रुपयांपर्यंत खाली आला. (One97 Communications Share Price) गेल्या दोन दिवसांत हा शेअर्स सुमारे १३ टक्क्यांनी वाढला होता. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर तात्काळ कोणताही दिलासा न मिळाल्याने पेटीएमच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण झाली आहे.

‘हे’ शेअर्स वधारले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरण समितीने (RBI MPC) रेपो दर सलग सहाव्यांदा ६.५० टक्क्यांवर कायम ठेवल्यानंतर बँकिंग, फायनान्स, ऑटो आणि रिअल इस्टेट यासारख्या दर संवेदनशील क्षेत्रांचे शेअर्स ८ टक्क्यांपर्यंत घसरले. (Stock Market Closing ‍‍Bell)

LIC ची रॉकेट भरारी

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) च्या शेअर्सनी गुरुवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. या शेअर्सने आज १,१०० रुपयांची पातळी ओलांडली. (Life Insurance Corporation of India (LICI) Share Price) त्यांच्या तिमाही निकालांपूर्वी LIC चे शेअर्स वाढल्याचे दिसून आले. आजच्या तेजीमुळे भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी असलेल्या एलआयसीच्या बाजार भांडवलाने ७ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर्स बीएसईवर ९ टक्क्यांनी वाढून १,१४४ च्या नव्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात या शेअर्सने १,११५ रुपयांवर व्यवहार केला. यामुळे LIC च्या बाजार भांडवलाने गुरुवारी प्रथमच ७ लाख कोटींचा टप्पा ओलांडून तो भारतातील चौथा सर्वात मोठा स्टॉक बनला आहे.

चिनी शेअर्समध्ये तेजी, निक्केई नव्या शिखरावर

चीनी शेअर्सनी गुरुवारी आठवड्याची तेजी राखण्यात यश मिळविले. कारण चीनने बाजारातील भावना पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. तर बँक ऑफ जपानने व्याजदरात वाढ करण्यास नकार दिल्यानंतर निक्केई निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला. आशियामध्ये जपानचा निक्केई (.N225) २.१ टक्क्यांनी वाढून ३४ वर्षातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. दरम्यान, हाँगकाँगचा हँग सेंग १.३ टक्क्यांनी खाली आला.

हे ही वाचा :

Back to top button