गृहखरेदी आणि टीडीएस | पुढारी

गृहखरेदी आणि टीडीएस

जगदीश काळे

घर खरेदीदारांनी घर खरेदीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास प्राप्तिकराची नोटीस येऊ शकते. अलीकडेच घर खरेदी करणार्‍या अनेकांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. या नोटिसीत करचुकवेगिरीचा उल्लेख असतो. घर खरेदी करण्यापोटी झालेल्या व्यवहारांवर टीडीएसची आकारणी आणि भरणा योग्य रितीने झालेली नसेल तर तत्काळ टीडीएस भरावा लागतो. त्याचबरोबर त्यावरचे व्याजही भरणे आवश्यक आहे.

नियम काय सांगतो?

प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार घर खरेदीदार 50 लाखांपेक्षा अधिक मूल्यांची मालमत्ता खरेदी करत असेल, तर त्याला एक टक्के दराने टीडीएस भरावा लागतो. टीडीएसचा भरणा विक्रेत्याला देण्यात येणार्‍या रकमेतूनच केला जातो. शिवाय जर एखाद्या खरेदीदाराकडे पॅन क्रमांक नसेल तर टीडीएसची कपात ही वीस टक्के दराने करण्यात येईल. यातील एक नियम म्हणजे एखाद्याचा पॅन आधारशी लिंक नसेल तर त्यालाही जादा रक्कम भरावी लागणार आहे.

विक्रेत्याला देण्यात येणार्‍या रकमेतूनच टीडीएस कपात

प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या मालमत्तेची किंमत 50 लाखांपेक्षा अधिक असेल आणि मुद्रांक कर 50 लाखांपेक्षा अधिक असेल, तर अशा वेळी घर खरेदीदार हा विक्रेत्याला देण्यात येणार्‍या रकमेतून एक टक्का टीडीएस कापून घेईल. उदा. एखाद्या मालमत्तेची किंमत 60 लाख असेल, तर खरेदीदार विक्रेत्याला देण्यात येणार्‍या रकमेतूनच एक टक्के टीडीएस म्हणजे 60 हजार रुपये कापून घेईल.

एका महिन्यांत भरणा करणे गरजेचे

घर खरेदीदाराने टीडीएस कपात केल्यानंतर ती रक्कम तातडीने प्राप्तिकर विभागाकडे जमा करणे गरजेचे आहे. कारण प्राप्तिकर विभागाने दिलेल्या कालावधीनुसार, एखाद्या महिन्यांतील कोणत्याही तारखेला टीडीएस कापून घेतला असेल, तर त्याला पुढील महिन्यांच्या सात तारखेपर्यंत त्याचा भरणा करावा लागतो. याशिवाय घर विक्री करणार्‍या व्यक्तीला रिटर्न दाखल करताना या रकमेचा उल्लेख करावा लागेल.

पॅन आणि आधार लिंक नसल्यास

एखाद्या व्यक्तीकडे पॅन आणि आधार असेल आणि ते लिंक नसेल, तर 20 टक्के दराने टीडीएस कापून घेतला जाईल आणि हा दर खूप अधिक आहे. खरेदीदाराने ठरलेल्या वेळेत पैसे जमा केले नाही, तर त्यावरही दंड आकारला जातो. कारण टीडीएस कपात ही खरेदीदाराकडून केली जात असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा गैरप्रकार झाल्यास टीडीएसची रक्कम आणि त्यावर आकारले जाणारे व्याज आणि दंडदेखील खरेदीदारालाच भरावा लागेल. याशिवाय घर विक्रेत्या व्यक्तीचा आधार अणि पॅन लिंक्ड आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी खरेदीदाराची आहे.

किती व्याज आकारणी?

एखादा खरेदीदार टॅक्स कपात करत नसेल तर त्याला नोटीस येते. अशा वेळी त्याला दंड भरावाच लागतो. त्याचबरोबर थकबाकी देखील व्याजासह जमा करावी लागते. थकबाकी रकमेवर एक टक्के दरमहा दराने व्याज आकारणी केली जाते.

विक्रेत्याकडून दंड वसुली

विक्रेत्याने टीडीएस कपातीस मनाई केली तर आणि त्याच्याकडे आधार अणि पॅन नसेल किंवा आधार-पॅन लिंक्ड नसेल तर दंड किंवा व्याजाची रक्कम ही विक्रेत्याकडे मागता येते. अर्थात, पेनल्टी किंवा व्याज आकारणीला विक्रेता जबाबदार आहे की नाही, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

घर खरेदी करताना घ्यावयाची काळजी

घर खरेदी करत असाल तर व्यवहार करण्यापूर्वी सेलर्सचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक याची मागणी करा. त्यानुसार ऑनलाईन तपासणी करा. पॅन किंवा आधार नंबर आणि जन्मतारीख नमूद करताच विके्रत्याच्या मोबाईलवर ओटीपी जाईल. ओटीपी दिल्यानंतर त्याचा पॅन आणि आधार सक्रिय आहे की नाही, हे समजेल.

आव्हान देण्याचा पर्याय

सेलर्सकडून टीडीएस कपातीस इन्कार केला जात असेल किंवा त्याचा पॅन-आधार लिंक नसेल किंवा आधार-पॅन सक्रिय नसेल आणि या कारणांमुळे टीडीएस कपात केली गेली नसेल आणि प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आली असेल, तर अशा वेळी आपण म्हणजेच खरेदीदार प्राप्तिकर खात्याच्या लवादाकडे याचिका दाखल करू शकतात आणि टीडीएस जमा न करण्यास आपली कोणतीही चूक नाही, हे सिद्ध करू शकतात.

Back to top button