आयएमपीएस व्यवहारांबाबत नियमात बदल, ‘असे’ करा पैसे ट्रान्सफर | पुढारी

आयएमपीएस व्यवहारांबाबत नियमात बदल, 'असे' करा पैसे ट्रान्सफर

सुभाष वैद्य

एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे प्रत्यक्ष बेनिफिशरीच्या खात्यात जमा होण्यास काहीसा वेळ लागतो. त्यामुळे तत्काळ पैसे पाठवण्यासाठी आयएमपीएस ही सेवा वापरली जात आहे. याद्वारे तुम्ही ताबडतोब एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता.

इंटरनेट बँकिंगचा वापर करून एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित किंवा ट्रान्सफर करण्याचा पर्याय आजही अनेक जण वापरतात. सध्या गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे यांसारखी पेमेंट वॉलेट उपलब्ध असूनही आणि त्यांच्या वापरानेही थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा असूनही या अ‍ॅपबाबत आजही काहीशी असुरक्षितता लोकांच्या मनात आहे. त्यामुळे साधारणत: 25 हजारांपुढील व्यवहारांसाठी बहुतांश जण ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात. यामध्ये तीन पर्याय आहेत. आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस. आरटीजीएस म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. याद्वारे आपण सहजपणे मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा निधी ऑनलाईन हस्तांतरित करू शकतो. आरटीजीएसद्वारे तुम्ही 2 लाख रुपयांहून अधिक ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. या प्रक्रियेत रिअल टाईम आधारावर पैसे हस्तांतरित केले जातात. आठवड्याचे सातही दिवस 24 तास ही सेवा सुरू असते.

एनईएफटी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर हादेखील ऑनलाईन पैसे पाठवण्याचा एक मार्ग आहे. याद्वारे तुम्ही देशात कुठेही पैसे पाठवू शकता. एनईएफटीमध्ये पैसे पाठवण्यासाठी कमाल आणि किमान रक्कम निश्चित केलेली नाही. तसेच बहुतेक सर्वच बँका यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. ही सेवाही 24 तास सर्व दिवस वापरता येते.

एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे प्रत्यक्ष बेनिफिशरीच्या खात्यात जमा होण्यास काहीसा वेळ लागतो. त्यामुळे तत्काळ पैसे पाठवण्यासाठी आयएमपीएस ही सेवा वापरली जाते आहे. या सुविधेद्वारे तुम्ही ताबडतोब एखाद्याला पैसे ट्रान्सफर करू शकता. यामध्येही जास्तीत जास्त आणि कमीत कमी पैसे पाठवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑक्टोबर 2023 मध्ये आयएमपीएस ऑनलाईन बँक व्यवहार प्रणालीसाठी नवीन बदलांची घोषणा केली होती. या परिपत्रकानुसार, 1 फेब्रुवारीपासून लाभार्थी न जोडता ग्राहकांना बँक खात्यांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे हस्तांतरण करता येईल. नियामक संस्थेने सर्व सदस्यांना 31 जानेवारीपर्यंत सर्व आयएमपीएस चॅनेलवर मोबाईल नंबर आणि बँकेच्या नावाद्वारे निधी हस्तांतरण सुरू करण्यासाठी आणि स्वीकारण्याच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. एनपीसीआयचा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह ठरणारा असून, ऑनलाईन व्यवहार करणार्‍यांसाठी तो लाभदायक आहे.

नवीन बदल लागू केल्यामुळे, वापरकर्ते लवकरच पाच लाख रुपयांपर्यंतचे हस्तांतरण करू शकतील. अशा व्यवहारांसाठी, वापरकर्त्यांना मोबाइल नंबर, बँक खात्याची नावे, खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड यांसारखे प्राप्तकर्त्याचे (बेनिफिशरी) तपशील आधी नोंद करण्याची आवश्यकता नाही. वापरकर्ते एका सरलीकृत प्रक्रियेसह निधी हस्तांतरण कार्यान्वित करू शकतील. यासाठी फक्त ज्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे आहेत, त्या सदर खातेधारकाचे नाव, मोबाईल नंबर आणि बँकेचे नाव आवश्यक आहे.

कशी पार पडेल प्रक्रिया?

* सर्वप्रथम तुमच्या बँकेचे मोबाईल बँकिंग अ‍ॅप उघडा
* ‘फंड ट्रान्सफर’ विभागात जा.
* निधी हस्तांतरणासाठी निवडलेली पद्धत म्हणून ‘आयएमपीएस’वर क्लिक करा.
* बेनिफिशरीचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि लाभार्थी बँकेचे नाव निवडा. यामध्ये बँक अकाऊंट क्रमांक किंवा आयएफएससी नोंदवण्याची आवश्यकता नाही.
* आता पाच लाखांपर्यंतची तुम्हाला हस्तांतरित करायची असेल ती रक्कम नोंदवा.
* अन्य आवश्यक तपशील प्रदान करा आणि ओकेवर क्लिक करून व्यवहाराची पुष्टी करा.
* यानंतर सदर व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी वन-टाईम पासवर्ड (ओटीपी) तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तो नमूद केल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.
* एनपीसीआयने लागू केलेला नवा बदल स्वागतार्ह असला तरी आयमपीएससाठी काही बँकांकडून शुल्क आकारणी केली जाते, हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे आपापल्या बँकेची यासंदर्भातील पॉलिसी काय आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते.

Back to top button