मोदी इफेक्ट! LIC बनला देशातील चौथा सर्वात मोठा स्टॉक, ICICI ला मागे टाकले | पुढारी

मोदी इफेक्ट! LIC बनला देशातील चौथा सर्वात मोठा स्टॉक, ICICI ला मागे टाकले

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकल्यानंतर गुरुवारी शेअर बाजारात एलआयसीच्या शेअर्सने रॉकेट भरारी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर्स बीएसईवर ९ टक्क्यांनी वाढून १,१४४ च्या नव्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स १,११५ रुपयांवर व्यवहार करत होता. यामुळे LIC च्या बाजार भांडवलाने गुरुवारी प्रथमच ७ लाख कोटींचा टप्पा ओलांडून भारतातील चौथा सर्वात मोठा स्टॉक बनला. विशेष म्हणजे एलआयसीने ICICI बँक आणि इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, एलआयसी शेअर्सची तुलना नेहमीच मंद गतीने चालणारा हत्ती म्हणून गुंतवणूकदारांकडून केली जात होती. पण आज एलआयसीचे बाजार भांडवल सकाळच्या उशिराच्या व्यवहारात ७.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या दोघांचे प्रत्येकी बाजार भांडवल सुमारे ७ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. भारतातील सर्वात मूल्यवान स्टॉक्सच्या यादीत LIC आता एचडीएफसी बँक (१०.७२ लाख कोटी), टीसीएस (१५.१ लाख कोटी) आणि रिलायन्स (१९.५ लाख कोटी) यांच्या मागे आहे.

सरकारी कंपन्या विकल्याचा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचा दावा राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला होता. काँग्रेसनेच बीएसएनएल, एमटीएनएल, एचएएल आणि एअर इंडिया या कंपन्यांचा सत्यानाश केला. काँग्रेसने एलआयसी आणि एचएएलबाबतही बराच संभ्रम वाढवला. आता परिस्थिती बदलल्याचा दावा करून पंतप्रधान म्हणाले की आज एचएएल विक्रमी उत्पादन करत आहे आणि आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे. २०१४ मध्ये २३४ सरकारी कंपन्या होत्या. त्यांची संख्या २५४ झाली आहे. आज बहुतेक सार्वजनिक उपक्रम विक्रमी परतावा देत आहेत आणि गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे. अनुसूचित जाती जमातींच्या शिष्यवृत्तीबद्दल विरोधक असत्य माहिती पसरवित असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते.

हे ही वाचा :

 

Back to top button