निर्बंध शिथिल झाल्याने रोजगारवाढीची अपेक्षा | पुढारी

निर्बंध शिथिल झाल्याने रोजगारवाढीची अपेक्षा

शेअर बाजार 4 मार्चला शुक्रवारी बंद होताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 54333, 16245 अंकावर बंद झाले.
जागतिक पातळीवर सध्याच्या युद्धसद़ृश परिस्थितीचा परिणाम होणे स्वाभाविक होते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रती बॅरल 115 डॉलरवर गेले आहे. बर्‍याच कालावधीनंतर पेट्रोल, डिझेल इतके महाग झाले आहे. 2014 सालानंतर 8 वर्षांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात रेल्वे गाड्यांचा पर्याय असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत असतो. त्यातच पेट्रोल व डिझेलचे भाव सध्याच्या अंदाजाप्रमाणे प्रती लिटर 25 रुपयांनी वाढले, तर रस्त्यावरून होणारी प्रवासी व मालाची वाहतूक महाग होईल. सध्या जरी महागाई आटोक्यात असली तरी या सर्व पार्श्वभूमीवर नजीकच्या भविष्यात ती आणखी वाढू शकेल. नैसर्गिक वायूच्या किमती जर वाढल्या, तर त्याचा परिणाम नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर होईल. त्यामुळे एलपीजी आणि सीएनजी यांच्या किमतीत प्रती किलो 10 ते 15 रुपयांची वाढ संभवते.

फेब्रुवारीमध्ये देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 8 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इकॉनॉमी (उचखए) च्या आकडेवारीनुसार यंदा फेब्रुवारी 2022 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारी 2.51 टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांवर गेली आहे. तर शहरांमधील बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यात 7.55 टक्क्यांवर पोहोचला. हा गेल्या चार महिन्यांतील नीचांकी दर आहे. तरीही लॉकडाऊन आता सैल केल्यामुळे यापुढील काही महिन्यांत रोजगार वाढावा. भारतात आता डिजिटल पद्धतीने व्यवहार वाढत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही या बदलाची दखल घेतली आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा भारतात वस्तुसेवा कर (जीएसटी) सुरू झाला, तेव्हा हा कर लोकांच्या किती पचनी पडेल. याबाबत संभ्रम होता, पण नागरिकांनी हा कर लगेच समजून घेतला. वस्तुसेवा करामुळे महागाई वाढेल हा संभ्रमही दूर झाला. फेब्रुवारी 2022 मध्ये वस्तुसेवा कराचे (जीएसटी) उत्पन्न 1 लाख 33 हजार 26 कोटी रुपयांवर गेले आहे. फेब्रुवारी 2021 या महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी 2022 मध्ये वस्तू सेवा कराच्या (जीएसटी) उत्पन्नात 18 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

यंदा रब्बी पिकाचे उत्पादन समाधानकारक झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन खूप वाढले आहे. कझाकिस्तान, जॉर्जिया, टर्की, इजिप्त आणि पाकिस्तान हे देश रशिया व युक्रेनकडून गव्हाची आयात करत होते. पण हा ओघ थांबला, तर हे देश आपोआप भारताकडेच वळतील आणि त्याचा परिणाम आपली गव्हाची निर्यात वाढण्यावर होईल. 2021 मध्ये भारताने 61.2 लाख टन गव्हाची निर्यात केली होती. यंदा ही निर्यात आणखी वाढेल.

कोरोनाच्या साथीमुळे महागाईत भर पडणार आहे. त्यातच रशिया व युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अ‍ॅल्युमिनियम, तांबे, पोलाद, जस्त यांचे भाव विक्रमी पातळीवर वाढले आहेत. कच्च्या तेलाचे (पेट्रोल व डिझेल) भाव भडकले आहेत. फ्रीज, एसी, कूलर यांच्या किमती उन्हाळा येऊ लागल्याने विक्रेत्यांनी वाढवल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ व्हावी.
निर्देशांकासाठी ज्या 30 शेअर्सच्या किमती बघितल्या जातात. त्यातील 19 कंपन्याचे शेअर्सचे समभाग वाढले तर उरलेले 11 कंपन्यांचे समभाग घसरले. वाढलेल्या प्रमुख समभागांमध्ये खालील कंपन्यांचा समावेश आहे.

पॉवरग्रीड, टेक महिंद्रा, एनटीपीसी, विप्रो, एचसील टेक, आयटीसी, टीसीएस, टाटा स्टील, इंड्सइंड बँक, सन फार्मा. घसरलेल्या समभागांमध्ये खालील कंपन्यांचा समावेश होतो. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह नेस्ले, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज.
शेअस बाजारात घसरण झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारात नोंदवलेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 251 लाख कोटी रुपये झाले. बाजारातील घसरण अशीच चालू राहील, तर गुंतवणूकदारांनी आपल्या आवडत्या शेअर्समध्ये जरूर खरेदी करावी.

‘फेज थ्री’

यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘फेज थ्री’ ऋरूश ढहीशश ची निवड केली आहे. होम टेक्स्टाईल विभागातली ही एक कंपनी आहे. टॉवेल्स, बेडशीटस्, बाथमॅटस् (पायपुसणी), रग्ज अशा दैनंदिन उपयोगासाठी लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन आहे व त्यांची निर्यातही ती मोठ्या प्रमाणावर करते. युरोप, ग्रेट ब्रिटन, अमेरिका या मोठ्या देशांतून तिची लक्षणीय निर्यात आहे. खालील कंपन्यात तिच्या वस्तू निर्यात होतात. उदा. वालमार्ट, टार्गेट, कॉस्को, गिर्‍हाईकांच्या जरूरीप्रमाणे ती आपली उत्पादने करते आणि त्यांची निर्यात करते. रुपया व डॉलरचा विनिमय दर सध्या निर्यातीला जास्त संधी देत आहे. तिच्या निर्यातीत गेल्या वर्षी लक्षणीय वाढ झाली. पुढील सहा महिन्यांसाठी तिच्याकडे भरपूर ऑर्डर्स आहेत. त्यामुळे आपल्या भागभांडारासाठी या शेअरचा जरूर विचार करावा.

या कंपनीची मार्च 2020 या आर्थिक वर्षाची नक्त विक्री 302 कोटी रु. होती, तर मार्च 2021 या आर्थिक वर्षासाठी ती 324 कोटी रु. होती. मार्च 2022 ला संपणार्‍या वर्षासाठी ती 480 कोटी रु. अपेक्षित आहे. तसेच 2023 या आगामी वर्षासाठी ती 560 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मार्च 2020 ते मार्च 2023 या चार वर्षांसाठी तिचे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 8 रु., 10.3 रु., 19 रुपये व 23 रुपये होते/असेल. तिचा सध्याचा भाव 306 रु.च्या आसपास आहे. तो वर्षभरात 385 रुपये व्हावा.

– डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button