पुढारी ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी तेजीत सुरुवात केली. निफ्टीने २२,७९४ अंकाला स्पर्श करत नवा उच्चांकी विक्रम नोंदवला. तर सेन्सेक्स ३७५ हून अधिक अंकांनी वाढून ७५ हजारांवर खुला झाला. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह शेअर्समधील जोरदार तेजीचा बाजाराला सपोर्ट मिळाला.
निफ्टीवर बजाज फायनान्सचा शेअर्स ६ टक्क्यांनी तर बजाज फिनसर्व्हचा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढला आहे. ओएनजीसी, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी हे शेअर्सही तेजीत आहे. दरम्यान, निफ्टीवर भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ, ब्रिटानिया या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक हे टॉप गेनर्स आहेत. तर भारती एअरटेल, एलटी, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे.
जागतिक बाजारातून सकारात्मक संकेतांच्यादरम्यान भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली. आशिया-पॅसिफिक बाजारातदेखील तेजी दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला आहे, तर हाँगकाँगचा हँग सेंग सुमारे २ टक्क्यांनी वाढला आहे.
हे ही वाचा :