बेळगाव महापालिका निकाल : भाजपची निर्णायक आघाडी | पुढारी

बेळगाव महापालिका निकाल : भाजपची निर्णायक आघाडी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निवडणुकीच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपचे 30 उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेसचे पाच तर म ए समितीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष 4 उमेदवार विजयी झाले असून त्या एमआयएमचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

सीमालढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगावमधील ही निवडणूक तीव्र चुरशीची पहायला मिळत आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी स्वतःच्या चिन्हांवर निवडणूक लढवली. 1984 मध्ये बेळगाव महापालिका अस्तित्वात आल्यापासून मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक अशाच निवडणुका होत आल्या. यंदा मात्र तो ट्रेंड बदलला आणि राष्ट्रीय पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले.

शिवाय ‘दिल्ली बदली आहे, अब बेळगाव बदलेंगे’ असे म्हणत ‘आप’ आणि असदुद्दीन ओवैसींचा एआयएमआयएमही रणांगणात उतरले. महापालिकेसाठी पंचरंगी लढत इतिहासात पहिल्यांदाच पहायला मिळाली.

महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. एकूण 4 लाख 31 हजार 383 मतदारांपैकी 2 लाख 17 हजार 160 जणांनी मतदान केले. त्यामध्ये 1 लाख 13 जार 396 पुरुष तर 1 लाख 3 हजार 764 महिला मतदारांचा समावेश आहे. म. ए. समिती, काँग्रेस, भाजप, एमआयएम, निजद, आम आदमी पार्टीच्या उमेदवारांसह 385 उमेदवार रिंगणात आहेत.

बेळगाव महापालिका निवडणुकीत तब्बल 38 माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते. त्यापैकी किती जण आपला गड राखतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य असणार आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी सुरु झाली असून, दुपारी 1 वाजेपर्यंत सारे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

बी. के. मॉडेल स्कूलमध्ये मतमोजणी सुरु असून, परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शिवाय बंदोबस्तासाठी दोन पोलिस उपायुक्तांसह 300 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button