बेळगाव : धावत्या रेल्वेत थरार; विनातिकीट प्रवास करणाऱ्या इसमाच्या हल्ल्यात रेल्वे कर्मचारी ठार

file photo
file photo

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात रेल्वे कर्मचारी जागीच ठार झाला. पुदूचेरी-दादर चालुक्य एक्सप्रेस क्र. ११००६ मध्ये गुरुवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंजी ते खानापूर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेत ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी , एस ८ बोगीमध्ये तिकीट तपासणी करत असताना टीसी अश्रफअली कित्तूर यांना एक व्यक्ती विना तिकीट प्रवास करत असल्याचे दिसून आले. कित्तूर यांनी त्याच्याकडे तिकीटाची मागणी केली. यावरून त्याने कित्तूर यांच्याशी वाद घालून आपल्या जवळील चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान कित्तूर यांचा आवाज ऐकून या डब्यात असलेले रेल्वेचे दोन स्वच्छता कर्मचारी टीसी कित्तूर यांच्या मदतीला धावले. त्या दोघांवरही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केला. यावेळी क्लिनिंग स्टाफ देवर्षी वर्मा याच्या छाती व गळ्यावर चाकूने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर टीसी अश्रफअली कित्तूर आणि आणखी एक क्लिनिंग स्टाफ तरुणाच्या हाताला चाकू लागल्याने ते जखमी झाले. अन्य प्रवाशांनी एस 8 बोगीकडे धाव घेतल्याने हल्लेखोराने उडी टाकून पलायन केले. बेळगाव देवर्षी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

धावत्या रेल्वेत भर दिवसा जीवघेणा हल्ल्याचा थरार घडल्याने प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुहास सतीश, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खानापूर रेल्वे स्थानक व गुंजी रेल्वे स्थानकाला रात्री उशिरा भेट देऊन पाहणी केली. खानापूर पोलिसांना रेल्वे पोलिसांशी समन्वय साधून तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्याची सूचना आयजी सुहास यांनी खानापूर पोलिसांना दिल्या आहेत.

हल्लेखोराचे धावत्या रेल्वेतून उडी घेऊन पलायन

हल्लेखोर इसम ४० ते ४५ वयोगटातील असल्याची माहिती जखमी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. खानापूर रेल्वे स्थानक येण्याआधीच गाडीचा वेग कमी झाल्यानंतर हल्लेखोराने उडी टाकून पलायन केले आहे. खानापूर पोलिसांच्या मदतीने रेल्वे पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. खानापूर ते गुंजी रेल्वे ट्रॅकच्या बाजूनेही पोलिसांनी शोध मोहीम राबवली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news