विमा पॉलिसी अत्यावश्यक मानली जाते. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्याबरोबरच करसवलतीचाही लाभ या माध्यमातून मिळतो. आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारीबरोबर खासगी कंपन्यांकडूनही अनेक विमा पॉलिसि दिल्या जात आहेत.
अनेकदा ग्राहक कोणताही विचार न करताना विमा पॉलिसी खरेदी करतात. मात्र ती पॉलिसी आपल्या फायद्याची नसल्याचे कालांतराने निदर्शनास येते. असे प्रकार हेल्थ आणि लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीत अधिक दिसून येतात. मात्र विमा नियामक संस्थेने ग्राहकांना आपला निर्णय परत घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ही संधी फ्री लूक पीरियड नियमानुसार मिळते. यानुसार पॉलिसी खरेदी केल्यानंतर ठराविक काळात आपण ती पॉलिसी परत करू शकतो आणि पैसे परत घेऊ शकतो.
फ्री लूक पीरियड जाणून घ्या : विमा नियामक इर्डा संस्थेच्या मते, आरोग्य आणि जीवन विमा कंपन्यांनी ग्राहकांना पंधरा दिवसांचा फ्री लूक पीरियड देणे बंधनकारक आहे. या पंधरा दिवसात आपल्याला पॉलिसीला समजून घेण्याची संधी दिली जाते. अर्थात, काही कंपन्यांकडून एक महिन्याचाही कालावधी दिला जातो. जर आपली फसवणूक झाल्याचे वाटत असेल किंवा एजंटने आपल्याला चुकीची माहिती दिल्याचे वाटत असेल, तर ती पॉलिसी परत घेऊ शकतो.
लाईफ इन्श्युरन्सचा फ्री लूक पीरियड आणि शुल्क : जेव्हा आपल्या हातात विमा पॉलिसी पडते, तेव्हापासून पंधरा दिवसांपर्यंत फ्री लुक पीरियड असतो. जर आपण पॉलिसीपासून समाधानी नसाल तर पंधरा दिवसात विमा कंपनीकडे पॉलिसी जमा करू शकतो. परंतु अशा स्थितीत विमा कंपनी आपण दिलेल्या काही हप्त्यातून काही पैसे कापून घेऊ शकते.
हेल्थ इन्श्युरन्समध्येही सुविधा : हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसंदर्भात पंधरा दिवसात फ्री लुक पीरियड मिळतो. जर आपण हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसंदर्भात समाधानी नसाल तर पंधरा दिवसात कंपनीला पॉलिसी परत करू शकतो.
हेल्थ इन्श्युरन्स परत देण्याचे शुल्क : हेल्थ इन्श्युरन्ससंदर्भात पॉलिसी परत देताना कंपन्या शुल्क आकारतात. पॉलिसी उतरवल्यानंतर आपण किती दिवसात ती पॉलिसी परत करतो, त्यानुसार शुुल्क वसूल केले जाते. यात इन्श्युरन्स चार्ज, तपासणी खर्च, पॉलिसी बाँडवरील स्टँप ड्यूटी आदींची कपात करून उर्वरित पैसे परत दिले जातात. इंडेम्निटी पॉलिसीमध्ये गंभीर आजाराचा आणि पर्सनल अॅक्सिडेेंटला कवच दिलेलें असते. या पॉलिसीची मॅच्युरिटी किंवा कालावधी हा कमीत कमी तीन वर्षाचा असेल तरच पंधरा दिवसाच्या फ्री लुक पीरियडची मूभा दिली जाते.