बेळगाव महापालिका निवडणूक : मराठी अस्मिता की राष्ट्रीय पक्ष? | पुढारी

बेळगाव महापालिका निवडणूक : मराठी अस्मिता की राष्ट्रीय पक्ष?

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निवडणूक साठी तब्बल आठ वर्षांनंतर शुक्रवारी (दि. 3) मतदान होणार आहे. या निवडणुकीची प्रतीक्षा फार काळ करावी लागली तरी, प्रचारासाठी मात्र अत्यल्प वेळ मिळाला. त्यामुळे घाईगडबडीत होत असलेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची काँग्रेस आणि भाजप या प्रमुख राष्ट्रीय पक्षांशी टक्‍कर असणार आहे. यामध्ये मराठी अस्मिता की राष्ट्रीय पक्षांकडे महापालिका जाणार हे मतदानावरून स्पष्ट होणार आहे. प्रशासनाने निर्भयपणे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले असून मतदान केंद्रांसह शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी तब्बल 1826 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. बी. के. मॉडेल हायस्कूलमधून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) शहरातील 415 मतदान केंद्रांवर पाठवण्यात आल्या. त्या पाठवण्यासाठी सर्व मतदान केंद्र अधिकार्‍यांकडून मशिनची तपासणी करण्यात आली. आवश्यक साहित्याची चाचपणी करण्यात आली. कर्मचार्‍यांना ने?आण करण्यासाठी 25 बसेसची सोय करण्यात आली होती. तर पोलिसांसाठीही वाहनांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे बी. के. मॉडेलचा संपूर्ण आवार गर्दीने फुलून गेला होता.

बेळगाव महापालिका निवडणुकीत मराठी वर्चस्व अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कंबर कसली आहे. तर यंदा पहिल्यांदाच काँग्रेस आणि भाजपने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबत आम आदमी पार्टी, निजद, एमआयएम हे पक्षही महापालिका निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या प्रचाराला राज्यातील मोठ्या नेत्यांनी बेळगावात उपस्थिती दर्शवली होती. तर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही पत्रकार परिषद आणि दर्ग्यात दर्शन घेत प्रचारात सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कोणताही स्टार प्रचारक नव्हता तरीही सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठी जनतेला महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरील या आवाहनाव्दारे प्रचार करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रभागातील पंचांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारांची निवड केली. 23 जणांवर अधिकृत शिक्‍कामोर्तब केले. 22 प्रभाग पंचांच्या निर्णयानुसार खुले सोडण्यात आले. त्यानंतरही अखेरच्या दिवसापर्यंत एकीसाठी प्रयत्न करण्यात येत होते. राष्ट्रीय पक्षांनी 11 बंडखोरांना पक्षातून बाहेर काढले. त्यांच्यावर सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. त्यामुळे अल्पावधीच्या प्रचारातही चांगली रंगत आली होती.

जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदार आणि समर्थकांकडून घरोघरी जाऊन, फोनवर संपर्क साधून मतदानाचे आवाहन करण्यात येत होते. या निवडणुकीत पैशांचाही मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे आढळून आले. त्यामुळे उमेदवारांचे निवडणुकीतील भविष्य इव्हीएम बंद होणार असून अधिकाधिक मतदान आपल्याला व्हावे, यासाठी उमेदवारांकडून रणनीती आखण्यात येत होती.

प्रशासनाकडून पूर्ण तयारी : आयुक्‍त डॉ. घाळी

महापालिकेसाठी शुक्रवारी होणार्‍या मतदानासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या सूचनेनुसार कोठेही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. बी. के. मॉडेल येथे कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

पोलिस यंत्रणा सज्ज : आमटे

बेळगाव : महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. याआधीच आवश्यक ती तयारी केली असून मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याकडे आमचे लक्ष असणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त विक्रम आमटे यांनी दिली.

बी. के. मॉडेल हायस्कूल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीसाठी पोलिसांनी तीन ठिकाणी पथसंचलन केले आहे. शहरात काही संवेदनशील प्रभाग आहेत. त्याठिकाणी अतिरिक्‍त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. केएसआरपी, होमगार्ड यांचाही वापर यावेळी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर 144 कलम लागू असणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना या शंभर मीटरच्या बाहेरही मंडप घातला येणार नाही.

कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. महापालिकेच्या सेक्टर अधिकार्‍यांनी इतर तक्रारी दिल्यास त्या दाखल करून घेण्यात येतील. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, यावर आमचे लक्ष आहे, असेही उपायुक्‍त आमटे यांनी सांगितले. यावेळी एसीपी नारायण बरमणी, ए. चंद्रप्पा, सदाशिव कट्टीमनी आदी उपस्थित होते.

Back to top button