

* रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्याची घोषणा. पुढील दहा वर्षात ग्रीन हायड्रोजन एनर्जीची किंमत 1 डॉलर प्रती किलोपेक्षा खाली आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट. सध्या ही किंमत 3.6 डॉलर ते 5.8 डॉलर प्रती किलोच्या दरम्यान आहे.
* देशातील महत्त्वाची जीवन विमा कंपनी 'एचडीएफसी लाईफ'ने याच क्षेत्रातील कंपनी 'एक्साईड लाईफ' खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकूण 6687 कोटींना ही खरेदी केली जाणार. 30 जूनच्या आकडेवारीनुसार एक्साईड लाईफचे व्यवस्फान अंतर्गत बाजारमूल्य (एयूएम) 18480 कोटी रुपये आहे. कंपनी खरेदी करण्यासाठी एचडीएफसी लाईफचे 87 दशलक्ष समभाग 685 रु. प्रतिसमभाग दरावर जारी केले जाणार. तसेच 726 कोटी रुपये रोख (कॅश पे आऊट) स्वरूपात हस्तांतरित केले जाणार.
* ऑगस्ट महिन्यात 'जीएसटी'च्या स्वरूपात एकूण 1 लाख 12 हजार कोटींचा कर सरकारजमा झाला. मागील महिन्याच्या तुलनेत कर संकलनात 3.8 टक्क्यांची घट झाली. परंतु मागील वर्षाची तुलना करता, ही वाढ 30 टक्के आहे.
* 'इंडियन शुगर मिल्स असोसिएशन' या साखर कारखानदारांच्या संघटनेने साखरेची किमान आधारभूत किंमत तातडीने 31 रु. प्रती किलोवरून 35 रु. प्रती किलोपर्यंत वाढवण्याची मागणी केली. पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात – फेब्रुवारी 2019 'एमएसपी'मध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु उसाच्या एफआरपीमध्ये दोनदा वाढ झाली. तसेच कच्चा माल व इतर किरकोळ खर्चांमध्ये, वेतनांमध्ये 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाल्याने साखर व्यवसाय अडचणीत सापडल्याचे प्रतिपादन करण्यात आले. लवकरच नवीन वर्षाचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याने त्याआधी ही मागणी मान्य करण्याची विनंती साखर कारखानदारांच्या संघटनेने केली.
* वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्या 'स्नॅपडील' या कंपनीचा लवकरच 'आयपीओ'च्या मार्गाने भांडवल बाजारात उतरण्याचा मानस. आयपीओच्या मार्गाने 40 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट. यासाठी कंपनीमधील प्रमुख गुंतवणूकदार 'सॉफ्ट बँक'शी चर्चा. या पश्चात कंपनीचे बाजारमूल्य तब्बल 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता शहरात कंपनीचे जाळे पसरले आहे.
* फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेलमधील व्यवहारासंबंधी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. रिलायन्स रिटेल व फ्युटर रिटेल यांच्या एकत्रीकरणाच्या व्यवहारावर अॅमेझॉन कंपनीने आक्षेप घेतला होता. एकूण 24713 कोटींचा हा व्यवहार कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित करण्यात आला. फ्युचर रिटेलमधील प्रमुख गुंतवणूकदार अॅमेझॉन असल्याने त्यांना अंधारात ठेवून व्यवहार केला गेल्याचे अॅमेझॉनचे म्हणणे आहे.
* 'जेएसपीएल' कंपनीला आपली उपकंपनी 'जिंदाल पॉवर'मधील 96.42 टक्के हिस्साविक्री करण्यासाठी समभागधारकांनी (शेअर होल्डर्सनी) मंजुरी दिली. 'वर्ल्डवन' ही कंपनी जिंदाल पॉवर 7401 कोटींना खरेदी करणार.
* भारताची निर्यात ऑगस्ट महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत 45 टक्के वधारून 33.1 अब्ज डॉलर्स झाली. तसेच आयात 51 टक्के वधारून 47 अब्ज डॉलर्स झाली. आयात व निर्यात यातील फरक दर्शवणारी व्यापारतूट मागील चार महिन्यांच्या उच्चतम स्तरावर म्हणजेच 13.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. तसेच जून तिमाहीचा भारताचा जीडीपी मागील वर्षीच्या तुलनेत 20.1 टक्क्यांनी वाढला. परंतु कोविडपूर्व स्थितीशी तुलना करता अजूनही त्या पातळीपेक्षा जीडीपीमध्ये 9.2 टक्क्यांची घट.
* ऑनलाईन पेमेंटसंबंधी सेवा पुरवणारी प्रोसेस ('फ्यू' या कंपनीची मुख्य कंपनी) कंपनीकडून 'बिलडेस्क'ची 4.7 अब्ज डॉलर्सना खरेदी.
* भारताची परकीय गंगाजळी 27 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात थेट 17 अब्ज डॉलर्सनी वधारून विक्रमी अशा 634 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली.