बेळगाव : ‘ मळेकरणी ’ ची यात्रा, अडचणी सतरा | पुढारी

बेळगाव : ‘ मळेकरणी ’ ची यात्रा, अडचणी सतरा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : सीमाभागासह चंदगड, आजरा भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या मळेकरणी देवीच्या यात्रेत सहभागी लोकांचा उपद्रव स्थानिक गावकर्‍यांना सहन करावा लागत आहे. वाहनकोंडीसह तळीरामांचा वाढलेला वावर डोकेदुखी ठरत आहे. यासाठी ग्राम पंचायतीने उपाययोजना आखावी, अशी मागणी गावकर्‍यांतून करण्यात येत आहे.

पावसाळ्यातील काही आठवडे वगळता मळेकरणी देवीची यात्रा वर्षभर भरविण्यात येते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी हजारो भाविक याठिकाणी उपस्थित राहतात. दर्शनासाठी वाहनांसह हजेरी लावण्यात येते. यात्रा करणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी येणार्‍या भाविकांकडून वाहने रस्त्यावरच पार्किंग करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कल्लेहोळ क्रॉसपासून उचगावपर्यंतच्या मार्गावर वाहनांची गर्दी झालेली असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग करण्यात येतात. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश असतो. परिणामी वारंवार वाहनकोंडीच्या घटना घडतात. वाहने हाकताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. अनेकदा वादविवादाचे प्रसंग घडतात.

मंगळवारी आणि शुक्रवारी गावात होणार्‍या वाहनकोंडीमुळे गावातील बस उचगाव फाट्यावरून माघारी नेण्यात येतात. परिणामी विद्यार्थी, प्रवासी यांना पायपीट करावी लागते. कोवाड, आजरा, अतिवाड भागातून येणार्‍या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याठिकाणी येणारे बहुतांश भाविक मद्यप्राशन करतात. याठिकाणी असणार्‍या बारसमोर गर्दी झालेली असते. तर काहीजण शिवारात बसून मद्यपान करतात. मद्यपानानंतर प्लास्टिकचे ग्लास, काचेच्या रिकाम्या बाटल्या शिवारात फोडून टाकतात. त्यामुळे शेतातून काचा विखरुन पडतात. याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. पावसाळ्यात मशागत करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

मद्यपान करून काहीजण यात्रेला येणार्‍या आणि स्थानिक महिलांची छेडछाड काढण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच मंगळवारी काही मद्यपींना मारहाण करण्याचा प्रकार घडला. असे गैरप्रकार रोखण्यासाठी ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी गावकर्‍यांतून घेण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान दारूबंदीची मागणी

उचगावात घडणारे बहुतांश गैरप्रकार हे मद्यपी भाविकांकडून होत आहेत. परिणामी यात्रेवेळी गावात दारूबंदी करण्याची मागणी गावकर्‍यांसह भाविकांकडून करण्यात येत आहे. यात्रेत मद्यपान करणार्‍यांना ग्रामपंचायतीने दंड ठोठवावा, अशीही मागणी गावकर्‍यांसह भाविकांतून करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button