कर्नाटकात प्रज्वल पेनड्राईव्हचा ‘रानबाजार’ | पुढारी

कर्नाटकात प्रज्वल पेनड्राईव्हचा ‘रानबाजार’

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू व खा. प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणावर सध्या कर्नाटकचेच नव्हे, तर देशभरातील राजकारण केंद्रित झाले आहे. एकीकडे राजकारणी या प्रकरणाचा वापर आपल्या झोळीत मते पडण्यासाठी करत आहेत, तर समाजातील एक वर्ग लिंक प्लिज म्हणत मनोरंजनाचे साधन समजून एकमेकांना हे अश्लील व्हिडीओ शेअर करत आहेत. राजकीय फायदा अन् समाजाची ही मानसिकता पाहता राज्यात प्रज्वल पेनड्राईव्हचा ‘रानबाजार’ मांडल्याचे दिसून येते.

एखादे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यास संबंधित महिला अथवा तरुणीचे नाव, छायाचित्र, तिची ओळख इतकेच नव्हे, तर तिच्या कुटुंबीयांची नावेदेखील कुठे येऊ नयेत, असा कायदा आहे. हा कायदा फक्त प्रसारमाध्यमांना लागू नाही, तर यामध्ये आजचा वेगाने पसरणारा सोशल मीडियादेखील येतो. त्यामुळे अशा प्रकरणांचे व्हिडीओ जरी लीक झाले, तर ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत, ही नैतिकता समाजाने जपणे जरूरीचे आहे. परंतु, आजकालचा समाज एकीकडे असे करणारा पुरुष व महिलेला शिव्याशाप देतो अन् तेच व्हिडीओ पाहण्यासाठी कुठे मिळतात, याची चाचपणी करत असतो. यापुढे जाऊन तसे करणारा पुरुष कोणत्या जातीचा, त्याच्या संपर्कात आलेली स्त्री कोणत्या जातीची, त्यांचा धर्म कोणता, याच्या तळापर्यंत जाण्याचाही प्रयत्न करतो. मग ती जर आपल्या जातीची असेल, तर त्याबद्दल संताप व्यक्त करतो. प्रज्वलला अन् सदर महिलेला शिव्याशाप देताना तो व्हिडीओ अजून आपल्यापर्यंत कसा पोहोचला नाही, याबाबतही त्याचा विचार सुरू असतो, ही आजकालची वाढत चाललेली मानसिकता आहे.

या प्रकरणाचा बाऊ करत काँग्रेसकडून भाजप-धजद आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणी तो आपला हक्कच समजतात. परंतु, समाजाचे काय? समाज म्हणजे दुसरे कोणी नसून तुम्ही-आम्ही सर्व जण या समाजाचे घटक आहोत. आपण व्यवस्थित वागलो की समाजही व्यवस्थित बनतो. सध्या प्रज्वल प्रकरणात जे सुरू आहे, ते पाहिले तर राजकारण्यांबरोबरच समाजाची मानसिकतादेखील किती खालच्या थरापर्यंत जात आहे, याची प्रचिती येईल. प्रज्वलचा व्हिडीओ लीक झाला, त्यानंतर त्याचा तपास होऊन प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी केली, ही एक बाजू झाली. परंतु, दुसर्‍या बाजूला समाजातील मानसिक विकृतीदेखील अधिक उठून दिसत आहे.

प्रज्वल प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेताना तुमच्याकडे तो व्हिडीओ आहे का? लिंक पाठवा बघू, अशी विचारणा केली जात आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याचा एचडी व्हिडीओ मिळतो का बघा, इथपर्यंत समाजात चर्चा सुरू आहे. हे काही पहिल्यांदा घडते आहे असे नाही, तर कोणत्याही अश्लील प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला की त्याची अशीच चर्चा सुरू असते. एकीकडे माध्यमात असे प्रकरण गाजत असताना समाजातील एक घटक असा व्हिडीओ पाहण्यासाठी हपापलेला दिसून येतो. आपण पाहूया, यानंतर इतरांनाही पाठवूया, या मानसिकतेतून तो एका मोबाईलवरून दुसर्‍या अशारीतीने लाखो, करोडो ठिकाणी व्हायरल होत जातो. असे व्हिडीओ व्हायरल करण्यामागे चीड कमी अन् त्यातून स्वतःचे मनोरंजन करण्याचा भागच अधिक असतो. डीपफेक तंत्रज्ञानाच्या युगात एका फोटोवर दुसरा फोटो चिकटवून एकमेकांशी शेअर करत त्यातून आनंद लुटणारी आजची पिढी असे अश्लील व्हिडीओदेखील व्हायरल करत जाते.

असे प्रकरण घडल्यानंतर समाजाची नैतिक जबाबदारी ते व्हायरल होऊ नयेत, ही आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अश्लील व्हिडीओ एकमेकांना शेअर करणे आणि मोबाईलमध्ये ठेवणे हादेखील मोठा गुन्हा आहे. याची जाण प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काय व्हायरल करावे व काय करू नये, याचे भान समाजाने ठेवणे गरजेचे आहे.

‘त्या’ तरुणी, महिलांच्या मानसिकतेचे काय?

प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडे आहे. त्यांच्या दाव्यानुसार प्रज्वलचे असे सुमारे चार हजारांवर अश्लील व्हिडीओ आहेत. त्या प्रत्येक व्हिडीओमध्ये अनेक अविवाहित तरुणी व विवाहित महिलांचा समावेश आहे. व्हिडीओमधील चेहरे ओळखून पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे गुप्तरीत्या घडलेले तरुणी व महिलांचे हे कांड आता समाजासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महिला व तरुणी घाबरल्या आहेत. असंख्य सांसारिक महिला व अविवाहित तरुणींना जर पोलिस बोलावून चौकशी करू लागले, तर त्यांचे पितळ उघडे पडून संसार अडचणीत येणार आहेत. अविवाहित तरुणी असतील, तर त्यांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे तपासाला बोलावल्या जाणार्‍या तरुणी व महिलांनी आम्हाला जर ठाण्यात बोलावले तर आत्महत्या करू, अशी धमकी दिली आहे. ही एक बाजू अन् त्यांचे चेहरे जर या व्हिडीओमध्ये दिसत असताना ते व्हायरल झाले, तर त्यांनी समाजात जगायचे कसे? आपली बदनामी झाली, अब्रू गेली म्हणून काही जणी आत्महत्येचा मार्गदेखील पत्करू शकतात, याचा विचारदेखील समाजाने करण्याची गरज आहे.

Back to top button