Nashik Crime : नाशिकच्या घोटी येथे चिकन व्यावसायिकावर चाकूने हल्ला | पुढारी

Nashik Crime : नाशिकच्या घोटी येथे चिकन व्यावसायिकावर चाकूने हल्ला

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी येथे किरकोळ कारणावरून एका चिकन व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीत सदर व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी (दि. 6) रात्री 9.30 च्या सुमारास घोटी शहरातील वासुदेव चौकातील कालिका मंदिरासमोर रामरावनगर येथे आरिफ मोहमद पानसरे (38) हे पावभाजीच्या गाडीवर पावभाजी खात असताना त्या ठिकाणी सिद्धार्थ पांडुरंग भोर (27, रा. कालिका मंदिराजवळ, घोटी) याने पानसरे यांच्याशी विनाकारण वाद घालत चिकनच्या दुकानाचा जास्त पैसा झाला, असे म्हणून आरिफ पानसरे यांचा नवीन मोबाइल जमिनीवर आपटून फोडून टाकला.

एवढ्यावरच न थांबता सिद्धार्थ भोर याने आरिफ पानसरे यांना लाथाबुक्क्याने मारत हातातील चाकूने पानसरेंच्या तोंडावर, पाठीवर व पोटात वार करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने पानसरे गंभीर जखमी झाले. या हाणामारीत आरिफ पानसरे यांच्या खिशातील 20 हजार रुपये गहाळ झाले. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button