खरीप हंगामासाठी ‘एमएसपी’ वाढीस मंजुरी | पुढारी

खरीप हंगामासाठी ‘एमएसपी’ वाढीस मंजुरी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने 2022-23 च्या खरीप हंगामासाठी किमान हमीभावामध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीद्वारे खरीप हंगामातील पिकांसाठीचा किमान हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल किमान 92 ते 523 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन मूल्यावर 50 ते 85 टक्क्यांपर्यंत लाभ होणार असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

तूरडाळीवर 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ
मंत्रिमंडळाने तूरडाळीच्या एमएसपीत वाढ केली. यंदाच्या हंगामात तूरडाळीची एमएसपी 6,600 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 300 रुपयांची वाढ केली. तिळाच्या दरात 523 रुपयांची वाढ मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर तिळाच्या दरात 523 रुपये वाढ होईल. मूगडाळीवर प्रतिक्विंटल 480 रुपये, सूरजमुखीवर 358 रुपये प्रतिक्विंटल, तर भुईमूगवर 300 रुपये प्रतिक्विंटल वाढ केली.

अशी आहे वाढ

पीक – एमएसपी (2022-23) प्रतिक्विंटल (रुपये)
तांदूळ (सामान्य)- 2,040
तांदूळ (ग्रेड ए) – 2,060
ज्वारी (हायब्रिड) – 2,970
ज्वारी (मालदंडी) – 2,990
बाजरी – 2,350
रागी – 3,578
मका – 1,962
तूर – 6,600
मूग – 7,755
उडिद – 6,600
भुईमूग – 5,850
सूर्यफूल बी – 6,400
सोयाबीन (पिवळी) – 4,300
तीळ – 7,830
रामतीळ – 7,287
कापूस (मध्यम धागा) – 6,080
कापूस (लांब धागा) – 6,380

Back to top button