एमपीएससीच्या मुलाखत यादीत मृत स्वप्निल लोणकर यांचे नाव | पुढारी

एमपीएससीच्या मुलाखत यादीत मृत स्वप्निल लोणकर यांचे नाव

मुंबई; पुढारी वृतसेवा: दोन वर्षांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याच्या ताणतणावातून स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला ६ महिने झाले असताना आता एमपीएससीच्या मुलाखत यादीत मृत स्वप्निल लोणकरचे नाव आले आहे.

पुण्यातील फुरसुंगी येथील गंगानगरमध्ये २९ जून २०२१ रोजी लोणकरने आत्महत्या केली होती. आता २०१९ च्या एमपीएससी परीक्षेच्या मुलाखत यादीत त्याचे नाव आले आहे. तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. शिक्षण पूर्ण करून त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. राज्य लोकसेवा आयोगाची २०१९ ची पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत त्याच्या आत्महत्येवेळी जवळपास दीड वर्षापासून झालेली नव्हती.

याशिवाय स्वप्नील याने 2020 मध्येही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. ती पूर्व परिक्षाही स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परिक्षा अद्याप झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपुर्वीच्या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले होते.

ज्या मुलाखतीच्या यादीत आपले नाव पाहण्यासाठी स्वप्निल उत्सुक होता ती यादी मंगळवारी प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये स्वप्निलचे नाव आल्याने पुन्हा एकदा राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. आता स्वप्निल या मुलाखतीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे दु:ख त्याचे विद्यार्थी मित्र व्यक्त करत आहेत. ही यादी वेळेत जाहीर झाली असती तर कदाचित स्वप्निल ही मुलाखत देऊ शकला असता अशी भावना व्यक्त होत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button