सोनिया गांधींच्या घरी बैठक; यूपीएबाबत संजय राऊत म्हणाले.... | पुढारी

सोनिया गांधींच्या घरी बैठक; यूपीएबाबत संजय राऊत म्हणाले....

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सोनिया गांधींच्या घरी बैठक : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. हा मिनी संयुक्‍त पुराेगामी आघाडीचा ( ‘यूपीए’ ) प्रयोग आहे. देशात त्याचा आदर्श घेतला जात आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. १४) सोनिया गांधी यांच्या घरी झालेल्या बैठकीत ‘यूपीए’बाबत चर्चा झाली. आगामी काळात ती चर्चा आकाराला येईल, अशी माहिती संजय राऊत यांनी आज ( दि. १५) माध्‍यमांशी बाेलताना दिली.

आज संसदेत महागाईवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान अन्य विषयांवर बोलत असतात पण महागाई आणि भ्रष्टाचारावर ते बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

सोनिया गांधी यांच्या घरी मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, सीताराम येचुरी, फारुक अब्दुल्ला आदी नेते उपस्थित होते. या बैठकीविषयी माहिती देताना राऊत यांनी भाजपवर टीका केली.

ते म्हणाले, कालच्या बैठकीला देशातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. तसेच देशातील सद्यस्थिती, विधानसभेच्या निवडणुका आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीसाठी उपस्थित रहावे यासाठी सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यांनी मला बैठकीला जाण्याची सूचना केली. त्यानुसार मी उपस्थित होतो. आम्ही ‘यूपीए’चा भाग नाही पण महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता चालवतात हा मिनी ‘यूपीए’चा प्रयोग आहे. तो उत्तमप्रकारे चालला आहे. देशात या प्रयोगाचा आदर्श घेतला जात आहे.’

ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा होणार

ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. तसेच त्यांनी ‘यूपीए’त सहभागी होण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. याबाबतही या बैठकीत चर्चा केली. ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर देण्याबाबत चर्चा झाली. देशातील जनता महागाईने होरपळून निघत आहे. मोदी सगळ्यावर बोलतात; पण ते महागाई आणि अन्य विषयांवर बोलताना दिसत नाहीत, असेही ते म्‍हणाले.,

सोनिया गांधींच्या घरी बैठक : हिंदू म्हणून आम्हीच मते मागितली

हिंदूंना हिंदू म्हणून मतं मागणारी शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे. बाबरी पतन झाले तेव्हा कुणी जबाबदारी घेत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी त्याची जबाबदारी घेतली. आमचं हिंदुत्व पळपुटे नाही. आमचं हिंदुत्व केवळ देवळापुरते नाही. आमचं हिंदुत्व सामान्य माणसासाठी आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचलं का?  

Back to top button