सोलापूर : मुळेगाव तांड्यावर कारवाई ः 22 जुगार्‍यांवर गुन्हा | पुढारी

सोलापूर : मुळेगाव तांड्यावर कारवाई ः 22 जुगार्‍यांवर गुन्हा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा ते दोड्डी जाणार्‍या रस्त्यावरील अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बुधवारी रात्री छापा टाकला होता. या छाप्यामध्ये जागा मालक असलेल्या महिलेसह 22 जुगार्‍यांविरुध्द सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 17 हजार रुपये रोख, 11 दुचाकी, 5 मोबाईल, असा 6 लाख 44 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्याचा मालक सत्यजित ऊर्फ जितू धनसिंग पवार (वय 38, रा. मुळेगाव तांडा), प्रेम अंबादास बडेकर (31, रा. राजीव गांधी नगर, भवानी पेठ), जावेद अब्दुलगफूर बिजापूरे(33, रा. शास्त्री नगर), शिवशंकर मोहन मस्के (36, रा. सिध्दार्थनगर, सिव्हिलच्या पाठीमागे), सादिक बुडन बागवान (वय 30, रा. शास्त्री नगर), व्यंकटेश त्रिंबक लेकरूवाळे (वय 24, रा. डफरीन चौक), हणमंतू लक्ष्मण पवार (35, रा. साईबाबा चौक), स्वप्निल देविदास खैरमोडे (33, रा. शुक्रवार पेठ, भोई गल्ली), जमीर महिबूब बागवान (40, रा. लक्ष्मी मार्केट, मुल्लाबाबा टेकडी), अमिर ऊर्फ मुर्तुज जैनुद्दिन शेख (41, रा. रविवार पेठ), पद्माकर पांडुरंग कांबळे (28, रा. दोड्डी मूळ गाव बाभळगाव, ता. तुळजापूर), संतोष बाबू राठोड (36, रा. मुळेगाव तांडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जुगार अड्ड्यातील कारवाईवेळी पळून गेलेल्यांपैकी भैय्या हैद्राबादवाले (रा. सोलापूर), रफिक, अवधूत शेवाळे, नागा चौगुले, जहाँगीर, श्रीकांत उच्चे, पठाण सावकार, सिंकदर डांगे, रियाज शेख (रा. मौलाली चौक), जागा मालक प्रतिभा विनोद माने (रा. मुळेगाव तांडा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गेल्या तीनच दिवसांपूर्वी हैद्राबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरातील जितू पवार याच्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत 7 जुगारींना अटक करण्यात आली होती. ही कारवाई झाल्यानंतरदेखील जितू पवार याने लगेचच पुन्हा मुळेगाव तांडा ते दोड्डी जाणार्‍या रस्त्यावरील अतिकबाबा दर्ग्यासमोरील हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्राशेडमध्ये अंदर-बाहर पत्त्याच्या क्लब सुरू केला असल्याची माहिती सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती.

त्यावरून अधीक्षक सातपुते यांनी या क्लबवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांना दिल्या होत्या.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील जितू पवार याच्या क्लबवर बुधवारी सायंकाळी छापा टाकला. पोलिसांचा छापा पडल्याचे पाहून याठिकाणाहून अनेक जुगारी आजूबाजूच्या परिसरात पळून गेले.

यावेळी पोलिसांनी जुगार अड्ड्यातून 11 जुगारी, मोबाईल व 11 दुचाकी ताब्यात घेतल्या. तसेच 1 लाखाच्यावरती रोकड जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, मोहन मन्सावाले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने केली.

Back to top button