सोलापूर ः आमदारांच्या कार्यक्रमात झेडपी सदस्यांनाही निमंत्रित करा | पुढारी

सोलापूर ः आमदारांच्या कार्यक्रमात झेडपी सदस्यांनाही निमंत्रित करा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार्‍या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमास आमदारांसोबत जिल्हा परिषद सदस्यांनाही आमंत्रित करण्यात यावे, त्यांचे नाव निमंत्रणपत्रिकेवर व फलकावर घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत केली.

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहात स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य नितीन नकाते यांनी हा विषय उपस्थित केला. यास बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दिला.
जिल्हा नियोजन समितीचा निधी विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला मिळतो.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही विकासकामे होत असतात. असे असताना विकास कामांच्या उद्घाटनाचे नारळ मात्र आमदारांच्या हस्ते फोडण्यात येतात. जि.प.सदस्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत नसल्याची भूमिका यावेळी सदस्यांनी घेतली. त्यामुळे यापुढील कालावधीत आमदारांच्या कार्यक्रमात जि.प.सदस्यांना निमंत्रित करण्याच्या सूचना उपस्थित सर्व अधिकार्‍यांना करण्यात आल्या.

बालस्वास्थ्य आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी हृदयरोग असणार्‍या 46 बालकांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आले. या उपक्रमासाठी काही पालकांनी स्थायी समितीत येत सीईओ स्वामी यांचे आभार व्यक्त केले.

कृषी पंपासाठी अनियमित वेळेत वीजपुरवठा होत आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित करण्यात येत आहे. याबाबत जि.प.सदस्यांकडून महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. शेतकर्‍यांचा कृषी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात
आली.

Back to top button