शेपटीचा वापर हत्यारासारखा करणारा डायनासोर! | पुढारी

शेपटीचा वापर हत्यारासारखा करणारा डायनासोर!

सँतियागो :

लॅटिन अमेरिकन देश चिलीमध्ये डायनासोरच्या एका अनोख्या प्रजातीचे जीवाश्म सापडले आहे. या डायनासोरला घातक हत्यारासारखी शेपूट होती. अशा प्रकारची शेपूट आतापर्यंत अन्य कोणत्याही प्रजातीच्या डायनासोरमध्ये आढळून आलेली नाही. हा डायनासोर आपल्या शेपटीच्या सहाय्याने हल्ला करीत असे. तो 6.5 फूट लांबीचा होता.

7.1 ते 7.4 कोटी वर्षांपूर्वीच्या क्रिटेशस काळात हा डायनासोर अस्तित्वात होता. चिलीच्या पटागोनिया या दक्षिण भागातील मगाल्लान्स प्रांतात अशा डायनासोरचा एक संपूर्ण सांगाडा सापडला आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की ‘स्टेगॉरस इलेंगास्सेन’ असे नाव दिलेल्या या डायनासोरच्या शेपटीचा विकास एखाद्या हत्यारासारखाच झाला होता.

त्याच्या शेपटीत सात समतल हाडे जोडलेली आहेत. एखाद्या पानासारखी ही रचना आहे. या संशोधनातील मुख्य संशोधक सर्गियो सोटो यांनी सांगितले की ही शेपूट अतिशय आश्यर्यकारक अशीच आहे. अमेरिकेतील रॅटलस्नेक प्रजातीच्या सापाची किंवा काटेरी शेपटीच्या सरड्याची आठवण यावी अशी ही अनोखी शेपूट आहे. एके काळी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या आर्माडिलोसारखी ही देणगी त्याला मिळालेली होती. ग्रीक भाषेत ‘स्टेगॉरस’चा अर्थ ‘उंच शेपूट’ असा होतो.

Back to top button