नैसर्गिक र्‍हासाने उष्मा वाढला; उष्माघाताचा परिणाम नागरिकांना असह्य | पुढारी

नैसर्गिक र्‍हासाने उष्मा वाढला; उष्माघाताचा परिणाम नागरिकांना असह्य

जयदीप जाधव

उरुळी कांचन : कृषिप्रधान तालुका म्हणून आपल्या ‘काळ्या आईची सेवा’ करण्याची बिरुदावली एकेकाळी मिळविणार्‍या हवेली तालुक्यात निसर्गाचा होणारा र्‍हास सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्ग, साधनसंपत्ती, तसेच नैसर्गिक साधनांचा बेसुमार कत्तल होण्याचा प्रकार वाढल्याने तालुक्यातील हिरवाईची झालर दिवसेंदिवस लुप्त होत आहे. परिणामी, तालुक्यात उन्हाळ्यातील उष्माघाताचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. राज्यभरात उष्माघाताने कहर केला असताना जिल्ह्याच्या काही भागांत तापमानाचा पारा 40 अंश गाठू लागला आहे.

बारा महिने बागायती भाग असलेल्या पूर्व हवेली तालुक्यात उष्णतेचा ज्वर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शारीरिक क्रियेवर मोठा परिणाम जाणवू लागला आहे. दम लागणे, मळमळणे, चक्कर येणे, असह्य होणे अशा प्रकारांचा शारीरिक वेदनांना निमंत्रण मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर व कामगार वर्गाची ससेहोलपट या उकाड्याने सुरू आहे. पूर्व हवेली तालुक्यात मागील दीड दशकांपासून नैसर्गिक समृद्धतेची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावणे सुरू आहे. झाडाझुडपांची कत्तल, कायदे धाब्यावर बसवून सुरू असलेली वृक्षतोड यांच्यावर नियंत्रण नसल्याने निसर्गाची मोठा र्‍हास झालेला आहे. या ठिकाणी जमिनींना आलेला मोठा भाव, शहरीकरणाच्या नावाखाली सुरू असलेला कत्तलींचा नंगानाच, बेसुमार उत्खनन तसेच शेतकरीवर्गाची वृक्षसंवर्धनाबाबत असलेली अनास्था यामुळे पूर्व हवेलीतील नैसर्गिक शीतलता नष्ट झाली आहे. आता त्याचे परिणाम नागरिक भोगत आहेत.

बहुतांश ग्रामपंचायतींची उदासीनता कारणीभूत

पूर्व हवेली तालुक्यात नैसर्गिक संपत्तीचा विनाश होत असताना वृक्षलागवड व संवर्धनाबाबत बहुतांश ग्रामपंचायती उदासिन असल्याचे चित्र तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांमध्ये पर्यावरणाच्या समतोलतेचा दृष्टिकोनच नसल्याने गावे ओसाड दिसू लागली आहेत. तालुक्यात तुलनात्मक परिस्थिती जाणून घेता अष्टापूर व सोरतापवाडी ग्रामपंचायतींचा कारभार वगळता नैसर्गिक साधनसाम—गी अबाधित राखण्यासाठी कारभार्‍यांमध्ये फारसा उत्साह नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा

Back to top button