भ्रष्टाचार्‍यांना पक्षात घेऊन पंतप्रधान भ्रष्टाचाराशी कसे लढणार : संजय राऊत | पुढारी

भ्रष्टाचार्‍यांना पक्षात घेऊन पंतप्रधान भ्रष्टाचाराशी कसे लढणार : संजय राऊत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे, असे म्हणतात; पण देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना मोदी भाजपमध्ये घेत आहेत. त्यामुळे मोदी भ्रष्टाचाराशी कसे लढणार, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे, विरोधकांचा आवाज दडपण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आता जनतेलाही खरे रूप कळले आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांतील 25 नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते; मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर त्यापैकी 23 जणांना क्लीन चिट मिळाली आहे किंवा त्यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला गेला आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, हीच तर मोदींची भ्रष्टाचाराविरोधात खरी लढाई आहे. मला भ्रष्टाचार्‍यांविरोधात लढायचे आहे आणि इंडिया आघाडी भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र, सध्या परिस्थिती याच्याविरुद्ध दिसत आहे. पंतप्रधान आपल्या भाषणात नेहमी विरोधकांवरच टीका करतात; पण अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते शब्दही काढत नाहीत.

Back to top button