मनोज कोटक- गोपाळ शेट्टीसाठी सत्त्वपरीक्षा!; दोघांचेही राजकीय अस्तित्त्व पणाला | पुढारी

मनोज कोटक- गोपाळ शेट्टीसाठी सत्त्वपरीक्षा!; दोघांचेही राजकीय अस्तित्त्व पणाला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेले मनोज कोटक व गोपाळ शेट्टी या दोन खासदारांसाठी यंदाची लोकसभा निवडणूक सत्वपरीक्षा घेणारी ठरणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराजी असली तरी ती बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना विजय मिळवून देण्याचे काम या दोघांना करावे लागेल. या सार्‍यासाठी या दोघांचेही राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असतानाही भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी व मनोज कोटक यांना उमेदवारी नाकारली. भाजपचा हा निर्णय उत्तर मुंबई वगळता उत्तर पूर्व मुंबईत अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, आम्ही घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे सांगत भाजपचे मुंबईतील नेते उत्तर व उत्तर पूर्व मुंबई या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा दावा करीत आहेत.

एवढेच नाही तर हे उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विद्यमान खासदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही खासदार स्वत:ची नाराजी बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे पक्षाला दगाफटका बसण्याची शक्यता कमी आहे. पण उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या रूपाने तगडे आव्हान दिले आहे. अशा वेळी आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर, पक्षाने दिलेला उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे, हे ओळखून खा. कोटक रात्रंदिवस मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. भाजपचे पदाधिकारीही तहान-भूक विसरून त्यांच्या जोडीला आहेत. या मतदारसंघातील भाजप आमदारांसह माजी नगरसेवक व अन्य पदाधिकार्‍यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी मेहनत करताना दिसून येत आहेत. यातूनही काही दगाफटका झाल्यास त्याचा पहिला फटका खा. कोटक यांना बसू शकतो.

एवढेच नाही तर माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांचे राजकीय भवितव्यही डळमळीत होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, उत्तर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी स्पष्ट दिसून येते. विशेषत: शेट्टी गट तीव्र नाराज आहे. परंतु, ही नाराजी बाजूला ठेवून शेट्टी यांनीही आपले राजकीय भवितव्य पणाला लावून या मतदारसंघातील भाजप आमदार, माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना सोबत घेत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारकामाला लागले आहेत.

Back to top button