व्यक्तीद्वेषाला विकासकामांतून उत्तर : आ. शंकरराव गडाख | पुढारी

व्यक्तीद्वेषाला विकासकामांतून उत्तर : आ. शंकरराव गडाख

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : व्यक्तिद्वेषाच्या घाणेरड्या राजकारणावर स्वार्थाची पोळी भाजण्याची विरोधकांची नेहमीची कार्यशैली असली तरी आपण मात्र विकास कामातून त्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
आ. गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख 31 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नेवासा बुद्रुकच्या माकोटा वस्तीवरील सिंगल फेज रोहित्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेवासा बुद्रुक ग्रामस्थांनी आ.गडाख यांचा सत्कार केला.
आ. गडाख म्हणाले, 2009 ते 2014 या कालावधीत 958 ट्रान्सफॉर्मर तालुक्यात बसविले तसेच अनेक नवीन वीज उपकेंद्रे उभारले आहेत.

नेवासा बुद्रुकच्या माकोटा वस्तीवरील 30 ग्राहकांकरिता 30 लाख 31 हजार रुपये खर्च करून नवीन सिंगल फेज रोहित्र बसविल्याचे त्यांनी सांगितले. पाटपाणी व वीज या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी शासनाकडून अनेक मंजुर्‍या मिळविल्याचे नमूद करून मुळा धरणाच्या कॅनॉलसाठी 70 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळविल्याचे त्यांनी सांगितले. विजेच्या संदर्भात 70 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यामध्ये घोगरगाव, धनगरवाडी वीज उपकेंद्राचे काम मंजूर करून घेतल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भूषण शिंदे, अण्णाभाऊ पेचे, प्रकाश सोनटक्के, सर्जेराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

बहिरवाडी रस्त्यासाठी साडेतीन कोटी
नेवासा बुद्रुक येथील अनेक रस्त्यांच्या खडीकरण, मुरमीकरणाची कामे केली. नेवासा बुद्रुक-बहिरवाडी रस्ता कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. लक्ष्मी माता मंदिर, खंडोबा मंदिर सभा मंडपासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिला. नेवासा बुद्रुक हे क्रांतिकारक गाव असल्याचे आ. शंकरराव गडाख म्हणाले.

राजकारण म्हणजे संघर्ष असतो, संघर्ष विसरून पुढे गेले पाहिजे. संघर्ष कमी करा, आम्ही जे काम करतो त्याचाच खरा आनंद मिळतो. नवीन प्रश्न सुटण्यास मदत होते.
                                                                    – शंकरराव गडाख, आमदार.

नेवासा बुद्रुक येथील माकोटा वस्ती येथे आ. शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून सिंगल फेज वीज मिळाल्याबद्दल आ. गडाखांचे मनापासून आभार मानतो.
– अशोक मारकळी,
माकोटा वस्ती, नेवासा बुद्रुक.

Back to top button