Ratnagiri News : आंतरराज्य टोळीतील एका संशयिताचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

Ratnagiri News : आंतरराज्य टोळीतील एका संशयिताचा संशयास्पद मृत्यू

खेड: पुढारी वृत्तसेवा : सोने-चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी नाशिक येथून सोमवारी (दि. २१) अटक केली होती. दरम्यान, या टोळीतील एकाचा आज (दि.२३) उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता संशयास्पद मृत्यू झाला. मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८, तुळशीपूर जमुनिया, जि. भागलपूर, बिहार) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. Ratnagiri News

खेड शहरात दि. ८ जानेवारीरोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेला सोने-चांदीचे दागिने पॉलिश करण्याचे सांगून बेशुद्ध केले होते. आणि हात चलाखी करून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले होते. या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगडया व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन ते पळून गेले होते. खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर याचा तपास करत होते. त्यांच्या पथकाने नाशिकमधील मनमाड येथून सोमवारी (दि.२१) ही टोळी ताब्यात घेतली. Ratnagiri News

या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८), साजिद लाडू साह (वय २४), मोहंमद आबिद इल्यास शेख (वय २९), महमद जुबेर फती आलंम शेख (वय ३२, सर्व रा. तुळसिपुर जमुनिया, जि. भागलपुर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (वय ५० रा. मनमाड शिवाजी चौक ता. नांदगाव, जि. नाशिक) यांचा समावेश आहे.

या संशयित आरोपींपैकी मोहंमद सुबेर इम्रान शेख याला पोलिस कोठडीत अस्वस्थ वाटू लागल्याने कळंब वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला उलट्या होत असल्याने डॉक्टर एस. के. बळवंत यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मोहंमद शेख याचा मृतदेह शवविचछेदनासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येणार असल्याचे डॉ. बळवंत यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button