रत्नागिरीतील श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त शोभायात्रेच्या मार्गात बदल | पुढारी

रत्नागिरीतील श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त शोभायात्रेच्या मार्गात बदल

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रत्नागिरी शहर भगवे झाले आहे. सोमवारी होणार्‍या या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून निघणार्‍या शोभायात्रेच्या मार्गात बदल झाला असल्याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही शोभायात्रा

रामआळीतील श्रीराम मंदिरातून संध्याकाळी 4 वाजता सुरू होऊन ती गोखले नाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, आठवडा बाजार मार्गे पुन्हा राम मंदिराजवळ येणार आहे.

सोमवारी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. यानिमित्त रत्नागिरीतही राममय वातावरण बनले आहे. शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. अनेक आळी, वाड्यांमध्ये श्रीरामाचे चित्र असणारे भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. घरांवरही हेच झेंडे उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी नगर परिषद आणि श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने संध्याकाळी 4 वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा राम मंदिरापासून सुरू होऊन मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी मैदानात जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, आता शोभायात्रेचा मार्ग बदलण्यात आला आहे.

राम मंदिरपासून गोखले नाका मार्गे विठ्ठल मंदिर, आठवडा बाजार येथून पुन्हा श्रीराम मंदिरात येणार आहे. यानंतर राम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता स्व. प्रमोद महाजन मैदानात आतषबाजी होणार आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत थिबा पॅलेस मार्गावरील जयेश मंगल कार्यालयात अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार असून, घंटानादही केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार होण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.

Back to top button