वेंगुर्लेत होडी उलटून सात बुडाले; दोघांचा मृत्यू, दोघेजण बेपत्ता | पुढारी

वेंगुर्लेत होडी उलटून सात बुडाले; दोघांचा मृत्यू, दोघेजण बेपत्ता

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले बंदरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी वार्‍यामुळे होडी बुडाली. या दुर्घटनेत सातजण बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह होडीसह शुक्रवारी मिळाले. दोघे बेपत्ता आहेत. यापैकी तिघे पोहत किनार्‍यापर्यंत पोहोचल्याने ते बचावले आहेत.

बुडालेल्या खलाशांचा शोध सुरू आहे. दरम्यान, मृतदेह सापडलेल्या खलाशांचे नाव महादेव शंकर आंबेरकर (वय 66, रत्नागिरी) आणि शिवराम कोल असे आहे. गुरुवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट करत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

याच दरम्यान वेंगुर्ले बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लाँचवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, वादळी वार्‍यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे पोहून किनार्‍यापर्यंत पोहोचले. मात्र, चार खलाशी पाण्यात बुडून बेपत्ता झाले. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील, तर तीन खलाशी हे मध्य प्रदेश येथील आहेत. रात्री वादळी वार्‍याबरोबरच वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्याच अंधार्‍या रात्रीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. तत्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोधकार्य सुरू झाले. मात्र, त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नव्हता.

तीन खलाशी पोहून आल्याने वाचले

समुद्रकिनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता (49), राजा कोल (29) व सचिन कोल हे खलाशी बचावले आहेत. ते किनार्‍यावर आले असून, दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत.

चार खलाशी बेपत्ता; दोन मृतदेह सापडले

बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेश येथील चार खलाशांपैकी 2 खलाशी अद्याप बेपत्ता असून, त्यात आझान मुनीलाला कोल (16), चाँद गुलाम महम्मद यांचा समावेश आहे; तर यातील रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर यांचा मृतदेह मोचेमाड येथे, तर शिवराम कोल यांचा मृतदेह वेंगुर्ले सागरकिनार्‍यावळ सापडला आहे.

‘त्यांनी’ वाचविले महिलेला

गुरुवारी सायंकाळी ही मच्छीमारी नौका समुद्रात जाण्यासाठी वेंगुर्ले बंदरावर सज्ज होती. सर्व सातही खलाशी या नौकेवर चढत होते. दरम्यान, वेंगुर्ले बंदरावर मासे विक्री करणारी एक स्थानिक महिला बंदर जेटीच्या पायरीवरून घसरल्याने समुद्रात पडली. त्यावेळी याच खलाशांनी तिला पाण्याबाहेर काढले, अशी माहिती वेंगुर्ले बंदरावर काही मच्छीमारांनी दिली. त्यानंतर ही दुर्दैवी नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली आणि काही वेळातच या नौकेवर काळाचा घाला झाला आणि ही दुर्घटना घडली.

Back to top button