Cyclone Remal Update : ‘रेमल’ चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडकले; मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय | पुढारी

Cyclone Remal Update : ‘रेमल’ चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडकले; मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सूनची पूर्वेकडील (बंगालच्या उपसागराकडील) दुसरी शाखा सक्रिय झाली आहे. केरळकडील पहिल्या शाखेची गती मंदावली आहे. रविवारी या महाचक्रीवादळाचा वेग ताशी 130 किमीवर गेला होता. हे वादळ पश्चिम बंगालची किनारपट्टी पार करून सोमवारी बांंगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. (Cyclone Remal Update)

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘रेमल’ महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा पुढे गेला असून, रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळून ते सोमवारी, 27 रोजी ते बांगलादेशकडे जाईल. दरम्यान, या स्थितीमुळे मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय झाली असून तो नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यावर पोहोचला. त्यामुळे यंदाही तो केरळऐवजी बंगालच्या उपसागराच्या शाखेने राज्यात येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, याचा अंदाज चक्रीवादळ शांत झाल्यावरच अधिक स्पष्टपणे देता येईल. (Cyclone Remal Update)

हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले दोन शाखांचे अंदाज…

पहिल्या शाखेचा अंदाज : मान्सून प्रगतिपथावर असून, रविवारी निम्मा बंगालचा उपसागर, श्रीलंकेचा भूभागही दोन हिश्श्याने काबीज केला. 31 मेदरम्यान केरळात, 10 जूनदरम्यान मुंबईसह कोकणात, तर 15 जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत तसेच मराठवाडा विदर्भात त्याचे आगमन होऊ शकते.
दुसर्‍या शाखेचा अंदाज ः मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकरही सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या सहा जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र व खानदेशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे आधी होऊ शकते. मात्र, हे सर्व जूनच्या पहिल्या आठवड्यातील मान्सूनच्या घडामोडीवर अवलंबून असेल. (Cyclone Remal Update)

हेही वाचा :

Back to top button