रत्नागिरी : माजी आमदार दळवींची पक्षाकडून उपेक्षाच | पुढारी

रत्नागिरी : माजी आमदार दळवींची पक्षाकडून उपेक्षाच

दापोली; प्रवीण शिंदे : शिवसेना उद्धव ठाकरे या पक्ष संघटनेत नाराज असलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत दळवी यांची नाराजी नेमकी कुणावर? अशी चर्चा दापोलीत होत आहे. दळवी यांची नाराजी पक्षश्रेष्ठी दूर करणार की दुर्लक्ष करणार? याकडेदेखील दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.

दळवी यांनी पंचवीस वर्षे दापोलीत सेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. पडत्या काळात सूर्यकांत दळवी यांनी पक्षाला बळ दिले. पक्ष फुटीनंतर संघटना टिकविण्यासाठी प्रयत्न केले. असे असताना देखील पक्षात त्यांना विचारात घेतले जात नाही, अशी उघड नाराजी नागरिकांमधील चर्चेतून समोर येत आहे. त्यामुळेदेखील दळवी नाराज असतील, अशी चर्चा आहे.

शिवसेना नेते अनंत गीते आणि सूर्यकांत दळवी यांच्यातील अंतर्गत मतभेदाची धुसफुस आजही कायम आहे. दापोलीतील पक्षातील वेगवेगळ्या व्यासपीठावर दळवी, गीते कधीही एकत्र दिसले नाही. त्यामुळे दळवी यांच्या नाराजीचा सूर गीते यांच्याकडेदेखील असू शकतो, असे जाणकार सांगतात.

मागील काळात पक्षातील पदाधिकारी नेमणुकीत ‘हा नको, तो नको’ म्हणून अनेकांना डावलले होते. या प्रक्रियेत दळवींचे पदाधिकारी डावलण्यात आले होते. काही वेळा त्यांना अपमानित देखील करण्यात आले होते, अशी चर्चा होती. त्याला काही कार्यकर्ते दुजोरादेखील देत आहेत. त्यामुळे देखील दळवी दुखावले असतील, असाही सूर आहे.

दापोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेले व 25 वर्षांहून अधिक काळ राजकारणात कार्यरत असलेले दळवी आगामी काळात राजकीय भूमिका काय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

दळवी समर्थकांमध्ये नाराजीचा सूर

दळवी हे 25 वर्षे आमदार होते. पण त्यांना पक्षातून ना मंत्री पद ना महामंडळ. तरीदेखील दळवींनी शिवसेना सावरली. असे असताना आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात त्यांना नेतेपद अथवा उपनेते पद मिळणे आवश्यक होते. मात्र तसेदेखील झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दळवी यांच्या पदरी पक्षात वनवास कायम आहे. त्यामुळे दळवी समर्थकांत नाराजीचा सूर आहे.

Back to top button