दुसर्‍या सामन्यात पाकिस्तान पराभूत | पुढारी

दुसर्‍या सामन्यात पाकिस्तान पराभूत

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : इंग्लंडने दुसर्‍या टी-20 सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून 1-0 ने आघाडी घेतली आहे. सध्या पाकिस्तान इंग्लंड दौर्‍यावर असून, तिथे चार सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना जिंकून यजमान इंग्लिश संघाने आघाडी घेतली. दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् 23 धावांनी पराभव पत्करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 183 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना 51 चेंडूंत 84 धावा कुटल्या. त्याने 3 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने 37 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक (3) बळी घेतले, तर इमाद वसीम (2) आणि हॅरिस रौफ (2) यांनादेखील बळी घेण्यात यश मिळाले.

इंग्लंडने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने 26 चेंडूंत 32 धावा केल्या, मग फखर जमानने 21 चेंडूंत 45 धावा करून सामन्यात रंगत आणली; पण इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित 20 षटकेदेखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने 19.2 षटकांत सर्वबाद केवळ 160 धावा केल्या आणि सामना 23 धावांनी गमावला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. रिस टॉपलेने सर्वाधिक (3) बळी घेतले, तर मोईन अली (2), जोफ्रा आर्चर (2), ख्रिस जॉर्डन (1), आदिल राशीद (1) आणि लियाम लिव्हिंगस्टोनला (1) बळी मिळाला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : 20 षटकांत 7 बाद 183 धावा. (जोस बटलर 84, विल जॅक्स 37. शाहिन शाह आफ्रिदी 3/36, इमाद वासिम 2/19.)

पाकिस्तान : 19.2 षटकांत सर्वबाद 160 धावा. (फखर झमान 45, बाबर आझम 32. रीस टॉप्ले 3/41, मोईन अली 2/26.)

Back to top button