SATARA DCC bank : आमदार शिंदेंचा एका मताने पराभव करणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण? | पुढारी

SATARA DCC bank : आमदार शिंदेंचा एका मताने पराभव करणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (SATARA DCC bank) निवडणुकीत एक धक्कादायक निकाल लागला. जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मताने पराभूत झाले. शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. तर ज्ञानदेव रांजणे २५ मते घेऊन विजयी झाले.

ज्ञानदेव रांजणे हे जावली तालुक्यातील आंबेघर गावचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना रांजणे या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. रांजणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असले तरी भाजप आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक आहेत. जिल्हा बँकेच्या मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. तेव्हापासून त्यांनी आपल्या गटातील मतदार हे सहलीवर नेले होते. त्यांच्याकडे 29 मतदार असल्याचा दावा रांजणे यांनी केला होता.

आ. शिंदे यांना बिनविरोध करण्यासाठी रांजणे यांनी माघार घ्यावी, यासाठी अजितदादांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. परंतु, रांजणे यांनी माझ्याकडे मतदार असताना मी माघार का घ्यावी? असा उलट प्रश्न केला होता. यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशीही त्यांची विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले व आ. मकरंद पाटील यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यश आले नव्हते. त्यांनी अखेरपर्यंत माघार न घेता लढण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी लागलेल्या निकालात ज्ञानदेव रांजणे यांना 25 तर आ. शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली. रांजणे यांनी आ. शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. यामुळे आता जावली तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (SATARA DCC bank) निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांनी बँकेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. खटाव सोसायटीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रभाकर घार्गे यांनी पक्षाचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा पराभव केला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : 

Back to top button