सातारा जिल्हा बॅंक : शंभूराज देसाई, शशिकांत शिंदेंचा पराभव, चिठ्ठीवरून शेखर गोरे, सुनील खत्री विजयी | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक : शंभूराज देसाई, शशिकांत शिंदेंचा पराभव, चिठ्ठीवरून शेखर गोरे, सुनील खत्री विजयी

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांनी बँकेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. खटाव सोसायटीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रभाकर घार्गे यांनी पक्षाचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा पराभव केला.

सातारा जिल्हा बँकेसाठीची मतमोजणी जरंडेश्वर नाक्यावरील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या इमारतीत सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रारंभी सर्व सोसायटी मतदारसंघांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले. सुरुवातीलाच जावली सोसायटी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये आ. शिवेंद्रराजे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली. रांजने यांनी शिंदे यांच्यावर केवळ एका मताने निसटता विजय मिळवला.

कराड : पाटील यांचा आठ मतांनी विजय…

कराड सोसायटी मतदारसंघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 मते मिळाली. तर माजी सहकारमंत्री स्व. विलासराव उंडाळकर पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर पाटील यांना 66 मते मिळाली. पाटील यांनी आठ मतांनी विजय मिळवला. पाटण सोसायटी मतदारसंघात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा धक्कादायक पराभव झाला. राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांनी देसाई यांचा 14 मतांनी पराभव केला. पाटणकर यांना 58 तर देसाई यांना 44 मते मिळाली.

कोरेगाव : सुनील खत्री यांचा विजय…

कोरेगाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक आणि महेश शिंदे यांचे समर्थक सुनील खत्री यांना प्रत्येकी 45 अशी समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे या मतदारसंघाचा निकाल लावण्यात आला. यामध्ये सुनील खत्री यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

खटाव : शेखर गोरे विजयी

खटाव सोसायटी मतदारसंघात बंडखोरी केलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला. घार्गे यांना 56 तर मोरे यांना 46 मते मिळाली. माण सोसायटी मतदारसंघात चुरशीने मतदान झाल्यामुळे शिवसेनेचे शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना समान 36 मते पडली. या मतदारसंघातही चिठ्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये शेखर गोरे हे विजयी झाले.

नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था मतदारसंघात सहकार पॅनलचे रामभाऊ लेंभे यांना 307 मते मिळाली तर त्यांचे विरोधी उमेदवार सुनील जाधव यांना अवघी 47 मते मिळाली. मतदारसंघातील सहा मते बाद ठरवण्यात आली त्यामुळे लेंभे यांनी जाधव यांच्यावर 260 मतांनी मोठा विजय मिळवला.

शेखर गोरे यांचा पराभव…

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप विधाते यांनी शिवसेना नेते शेखर गोरे यांचा पराभव केला. प्रदीप विधाते यांना 1459 मते मिळाली. तर शेखर गोरे यांना 379 मते मिळाली. यामध्ये प्रदीप विधाते यांचा 1080 मतांनी विजय झाला. महिला प्रतिनिधी राखीव मतदारसंघात सत्ताधारी सहकार पॅनलच्या ऋतुजा पाटील यांनी 1445 तर कांचन साळुंखे यांनी 1292 मध्ये मिळवत विजय मिळवला. तर प्रतिस्पर्धी असलेल्या शारदादेवी कदम यांना 618 व चंद्रभागा काटकर यांना अवघी 141 मते मिळाली.

हे ही वाचा :
पहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं | Story of Blind Wrestler

Back to top button