Arvinder Singh Lovely joins BJP: दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

Arvinder Singh Lovely joins BJP: दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसातच अरविंदर सिंह लवली (Arvinder Singh Lovely joins BJP) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसला हा मोठा झटका बसला आहे. काँग्रेस पक्षाची आम आदमी पक्षासोबत आघाडी हे लवली यांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, “मी केवळ प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही,” असे त्यांनी सांगितले होते. मात्र आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकुमार चव्हाण, माजी आमदार नसीब सिंह, माजी आमदार नीरज बसोया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर २८ एप्रिलला अरविंदर सिंह लवली (Arvinder Singh Lovely joins BJP)
यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाचे अनेक नेते त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले होते की, “मी केवळ प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही.” पक्षाने मात्र त्यांचा राजीनामा तात्काळ स्विकारत त्यांच्या ठिकाणी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती केली.

दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते, आजी माजी पदाधिकारी लवली यांना भेटायलाही आले होते. त्यानंतर लवली इतर कुठे जातील, असे काँग्रेसच्या लोकांना वाटत नव्हते. मात्र आज अरविंदर सिंह लवली यांनी आज भाजप मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, केंद्रीय मंत्री हरदिपसिंह पुरी, खासदार अनिल बलुनी, संजय मयुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अरविंदर सिंह लवली यांच्यासह दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकुमार चव्हाण, माजी आमदार नसीब सिंह, माजी आमदार नीरज बसोया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासोबत केलेल्या आघाडीचा उल्लेख केला होता. लवली म्हणाले होते की, दिल्ली प्रदेश काँग्रेसने काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि गैरव्यवहाराचे आरोप लावलेल्या आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास विरोध केला होता मात्र या विरोधाला न जुमानता काँग्रेस पक्षाने राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी केली होती.

हेही वाचा 

Back to top button