सातारा डीसीसीचे रणकंदन; ‘आ. शशिकांत शिंदे यांचा विजय असो’ म्हणत राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक (Video) | पुढारी

सातारा डीसीसीचे रणकंदन; 'आ. शशिकांत शिंदे यांचा विजय असो' म्हणत राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक (Video)

सातारा ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोरेगाव मधील काही युवकांनी सातारा शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. संशयितांनी या निवडणुकीत पराभूत झालेले ‘आ. शशिकांत शिंदे यांचा विजय असो’ असे म्हणत दगडफेक केली. या घटनेमुळे साताऱ्यात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तोडफोड करणारे नेमके कोण याची चौकशी सुरू आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल बाहेर पडू लागला. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले. विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षातील ज्ञानदेव रांजणी यांनी पराभव केला. असे एक एक धक्कादायक निकाल बाहेर पडताच त्याचे पडसाद उमटू लागले.

काही कार्यकर्त्यांनी तडक राष्ट्रवादी कार्यालयावर जाऊन दगडफेक केली. ही घटना सकाळी दहा वाजता घडली. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांची पळापळ झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुमारे नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व कार्यकर्ते कोण आहेत? त्यांचा नेमका हेतू काय? याची पोलिस चौकशी करत आहेत. या घेटनेनंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

Back to top button