जिद्दीला सलाम ! 13 किमी अंतरावरील बससाठी 23 वर्षं केला पाठपुरावा | पुढारी

जिद्दीला सलाम ! 13 किमी अंतरावरील बससाठी 23 वर्षं केला पाठपुरावा

चांदेकसारे : पुढारी वृत्तसेवा : नाशिकचे येवला तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदा या दोन्ही गावांदरम्यान राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सुरू होण्यास तब्बल 23 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. रवंदा येथील एका नागरिकाने 2000 सालामध्ये बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. आश्चर्य असे की, त्यांची ही मागणी तब्बल 2023 सालामध्ये पूर्ण झाली. विशेष म्हणजे येवला ते रवंदा हे अंतर अवघे 13 किलो मीटर आहे.गावोगाव व दुर्गम भागात एसटी पोहोचली तर दुसरीकडे मागणी केल्यानुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, असे एसटी महामंडळाकडून सांगितले जाते, परंतु कोपरगाव तालुक्यात रवंदा येथील कारभारी खैरे यांना एसटी महामंडळाच्या विलंबाचा कटु अनुभव आला.

येवला व कोपरगाव तालुक्यातील रवंदा हे अंतर अवघे 13 ते 14 किलो मीटर आहे. या दोन्ही गावांमधून येणार्‍या- जाणार्‍यां प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे येथील नागरिकांसाठी बस सुरू करावी, अशी मागणी खैरे यांनी 1 जानेवारी 2000 रोजी येवला आगाराकडे केली होती. रवंदा – निमगाव (मढ) परिसरातील अनेक वृद्ध, दिव्यांग, विद्यार्थ्यांची येवला येथे ये-जा असते. या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. खैरे यांनी येवला- रवंदा बस सुरू करावी, अशी मागणी केली होती. वारंवार मागणी करून बस सुरू होण्याची हालचाल होत नव्हती. खैरे यांनी अनेकदा महामंडळाचे उप महाव्यवस्थापक, जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे भुजबळ निवेदनाद्वारे मागणी केली. त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना 23 वर्षांनंतर यश आले व रवंदा या मार्गावर बस सुरू करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button