पुढारी ऑनलाईन डेस्क: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (दि.१५) ४ वाजून ४५ मिनटांनी ते दिल्ली येथील विमानतळावर पोहचले आहेत. सुलतान हैथम बिन तारिक हे त्यांच्या कारकिर्दित पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतात त्यांचे आगमन होताच, परराष्ट्र मंत्रालयाचे व्ही. मुरलीधरन यांनी दिल्लीतील विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. (Oman Sultan Visit to India)
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांची भारताची ही पहिलीच राजकीय भेट असेल. यासोबतच ही भेट भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंधांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ओमानचा सुलतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावर भारतात येत आहेत. दरम्यान राजधानी दिल्लीत पोहोचल्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ओमानच्या सुलतानांची भेट घेतील. तसेच शनिवारी १६ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करतील, असेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Oman Sultan Visit to India)
भारत आणि ओमान यांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या जुनी मैत्री आहे. एवढेच नाही तर भारत आणि ओमान यांच्यातील लोकांशी संपर्क 5,000 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. भारत आणि ओमान या दोन्ही देशात १९५५ पासून राजकीय संबंध आहेत. २००८ मध्ये हे राजकीय संबध धोरणात्मक भागीदारीत बदलले. दरम्यान ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या भेटीदरम्यान भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंध एक महत्त्वाचा टप्पा पार करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.