Leopard News : बिबटेही होतात अनाथ | पुढारी

Leopard News : बिबटेही होतात अनाथ

आशिष देशमुख

पुणे : आईने सिम्बाला उसाच्या फडात जन्म दिला. पण, ऊस कापणी करताना आई तेथून निघून गेली. ती पुन्हा भीतीपोटी त्या ठिकाणी आलीच नाही. त्यामुळे सिम्बा अनाथ झाला. त्याला आम्हीच वाढविले. तो आता तीन वर्षांचा आहे. खेळतो, बागडतो, गुरगुरतो; पण त्याला शिकार करता येत नाही. कारण, तो अनाथ आहे. आईचे बाळकडू त्याला न मिळाल्याने तो शिकार करू शकत नाही… ही कहाणी सांगत होते जुन्नर वनविभागाचे अधिकारी.

जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका हा बिबट्यांचा आगारच बनला आहे. तेथे माणूस आणि बिबट्या हा रोजचा संघर्ष बनलाय. बिबट्याला माणसांची भाषा कळत नाही तसेच तो कुत्र्याप्रमाणे भाषा शिकू शकत नाही. मात्र, माणसाला शहाणे करता येते, त्याला बिबट्यापासून कसे वाचायचे, हे सांगता येते. माणिकडोह गावात बिबट्यांसाठी एक रेस्क्यू सेंटर शासनाने 2022 मध्ये उभे केले आहे.
या ठिकाणी आता अनाथ बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या ठिकाणी सध्या एकूण 40 बिबटे आहेत. त्यातील 15 ते 17 अनाथ आहेत, तर बाकीचे जखमी, तर काही नरभक्षक झाल्याने इथे कायमचे बंदिस्त आहेत.

…त्यांना पुन्हा जंगलात सोडले जात नाही

वन अधिकार्‍यासह येथील डॉक्टरांनी सांगितले की, अनाथ बिबट्यांसह या ठिकाणी नरभक्षक बिबटे आणि गंभीर जखमी झालेले बिबटे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. त्यांना पुन्हा कधीही जंगलात सोडले जात नाही. बिबट्या अतिशय आक्रमक असला तरी तो माणसाच्या अंगावर स्वतःहून धावून जाईल, अशी शक्यता कमीच असते. मुळात बिबट्या हा अत्यंत भित्रा प्राणी आहे. तो स्वतःची शिकार कोणीतरी चोरून नेईल, या भीतीपोटी अनेकांवर हल्ले करतो, त्यातूनच बिबट्या आणि माणसांचा संघर्ष आता टिपेला पोचला आहे.

…त्याला माणूस काय, हेही माहिती नाही

बिबट्या अतिशय क्रूर असून, तो आपल्या जिवावरच टपलेला आहे, अशी भावना लोकांची झाली आहे. मात्र, बिबट्याला माणसांच्या जगातले काही कळत नाही. त्याला एवढेच कळते की इथे शिकार आहे आणि ती आपल्याला मिळवायची आहे. परंतु, बिबट्यांच्या विश्वात शिरल्यावर जीवन किती कठीण आहे. त्याचे दुःख काय आहे, ते जुन्नरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये गेल्यावरच समजते, अशी भावना वारंवार येथील वनाधिकारी, डॉक्टर अन् प्रकल्प अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

अनाथ सिम्बा आहे सर्वांचा लाडका..

माणिकडोहच्या रेस्क्यू सेंटरमध्ये अनेक बिबट्यांपैकी एका बिबट्याकडे आमचे आवर्जून लक्ष गेले. तो म्हणजे तीन वर्षांचा सिंम्बा. हा सिम्बा उसाच्या फडात जन्मला पण त्याची आई त्याला सोडून गेली. उसाची काढणी सुरू होती, त्यावेळी अचानक माणसे आल्याने परंतु तिला पिल्लांकडे पुन्हा येता आले नाही. त्यामुळे सिम्बा कायमचा अनाथ झाला. त्याला वनाधिकार्‍यांनी रेस्क्यू सेंटरमध्ये आणून लहानाचे मोठे केले. तो तीन वर्षांचा झाला पण त्याला शिकार करता येत नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर तो आईने संस्कार केलेल्या बिबट्यासारखाच आक्रमक दिसतो. त्याची देहबोली अन् डोळेही भेदक आहेत. दिसायला अतिशय देखणा आणि आक्रमक आपल्यालाही भीती वाटते; परंतु त्याची शोकांतिका अशी आहे की त्याला शिकारच करता येत नाही.

हेही वाचा

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमधील आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी : ICMR चे नवे संशोधन

चटपटीत बटाटे

दुभाजकांवर रोपे का लावतात?

Back to top button