Pune News : भिडे वाडा स्मारकाचा सुधारित आराखडा | पुढारी

Pune News : भिडे वाडा स्मारकाचा सुधारित आराखडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने यापूर्वी केलेला भिडे वाडा स्मारकाचा आराखडा रद्द केला आहे. त्यामुळे तीन वास्तू विशारदांना स्मारकाचा सुधारीत आराखडा तयार करण्यास सांगितल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिली. दरम्यान, स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही 3 डिसेंबर रोजी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फुले दांपत्यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात 1848 साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती.

यात शिक्षण देण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षापासून भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुणे महापालिकेने भिडेवाडा ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक करावे, असा ठराव फेब—ुवारी 2006 मध्ये मुख्यसभेत मंजुर करण्यात आला. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये स्थायी समितीने त्यास मान्यता देऊन भूसंपादनाद्वारे ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

महापालिकेने यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू करून 327 चौरस मीटर जागेसाठी 1 कोटी 30 लाख रुपये मोबदला देण्यासाठी ही रक्कम भूसंपादन विभागाकडे भरली होती. मात्र, या वाड्यातील रहिवासी आणि व्यावसायीकांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील 13 वर्षांत न्यायालयात यावर तब्बल 80 वेळा सुनावणी झाली. उच्च न्यायालयात भिडे वाड्याची महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर सर्वोउच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. भाडेकरूंनी वाडड्याची जागा खाली करून देण्यास सहा महिन्याचा कालावधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळत एका महिन्याच्या आत वाडा रिकामा करून महापालिकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. महापालिकेने यापूर्वी स्मारकाचा आराखडा तयार केला होता. त्या आराखड्यात व्यावसायिकांनाही स्थान देण्यात आले होते.

मात्र, न्यायालयाने दिलेला निकालमध्ये व्यावसायिकांनी एका महिन्यात जागा महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे आदेश दिल्याने महापालिकेने यापूर्वी तयार केलेला आराखडा रद्द केला आहे. स्मारकासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात येणार असून त्या आराखड्यामध्ये व्यावसायिकांना स्थान नसेल. तीन वास्तू विशारदांना आराखडे तयार करण्यास सांगितले असून 3 डिसेंबरला जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button