इजिप्तच्या जगप्रसिद्ध स्फिंक्सची निर्मिती आधी वार्‍याने केली? | पुढारी

इजिप्तच्या जगप्रसिद्ध स्फिंक्सची निर्मिती आधी वार्‍याने केली?

कैरो : प्राचीन इजिप्शियन व ग्रीक संस्कृतीत ‘स्फिंक्स’ या काल्पनिक प्राण्याचे वर्णन आहे. त्याचे डोके माणसाचे, धड सिंहाचे आणि पंख गरूडाचे असतात. प्राचीन इजिप्शियन लोक स्फिंक्सला सूर्यदेवतेचे प्रतीक म्हणून पाहत असत. इजिप्तमध्ये गिझाच्या पिरॅमिड समोर इसवी सन पूर्व 2558 ते इसवी सन पूर्व 2532 या काळात फेरो खाफ्रे याच्या राजवटीत बनवलेला स्फिंक्सचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्याला मानवाने नंतर आकार दिला, आधी वार्‍यामुळे एका मोठ्या शिळेला आपोआपच तसा आकार मिळालेला असावा, असे आता संशोधकांनी म्हटले आहे.

गिझामध्ये खाफ्रेच्या पिरॅमिडसमोरच हा 4500 वर्षांपूर्वीचा स्फिंक्स आहे. आता याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘फिजिकल रिव्ह्यू फ्ल्युईडस्’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वार्‍यामुळे दगडाला स्फिंक्ससारखा आकार आधीच दिलेला असावा.

त्यानंतर या आकारातूनच अधिक तपशीलवार कोरीवकाम करून प्राचीन इजिप्शियन लोकांनी स्फिंक्सचा पुतळा घडवला असावा. त्यासाठी संशोधकांनी एक प्रयोग करून पाहिला. त्यांनी ठोस अंतर्गत भाग असलेला मऊ चिखलाचा एक गोळा घेऊन तो उष्ण पाण्यापासून येणार्‍या वार्‍याच्या सान्निध्यात ठेवला. यामधून त्या गोळ्याला अर्धा ‘ओव्हल’ आकार मिळाला. हा स्फिंक्सचा चेहरा असून अन्य भाग मान व पुढच्या पायांसारखे झाले. इजिप्तमध्येच फराफ्रा येथे असे काही आकार नैसर्गिकरीत्याच तयार झालेले पाहायला मिळतात.

Back to top button