फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त

फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ‘हा’ आहार उपयुक्त

प्रदूषणामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची अवस्था फार वाईट झाली आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम माणसांच्या फुफ्फुसांवर होतो. अशावेळी नागरिकांनी आपल्या फुफ्फुसांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याबाबतची ही माहिती…

सफरचंद : आपल्या आरोग्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. सफरचंदामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् असतात, जे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. जर तुम्ही रोज सफरचंदाचे सेवन केले तर तुमची फुफ्फुसे चांगली कार्य करतात आणि निरोगी राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही आठवड्यातून किमान 5 सफरचंद खावेत. यामुळे फुफ्फुसाशी संबंधित रोग 'सीओपीडी' होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय दमा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

भोपळा : लोक सहसा भोपळा ही एक सामान्य भाजी मानतात. पण त्यात बीटा कॅरोटिन, ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. भोपळ्याचे सेवन केल्याने फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. संशोधनानुसार, जर तुमच्या रक्तामध्ये कॅरोटिनॉइडस्चे प्रमाण चांगले असेल तर तुमचे फुफ्फुसे चांगले कार्य करतात.

हळद : हळद प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हळद अत्यंत शक्तिशाली अँटिआक्सिडंटस्ने समृद्ध आहे. कर्क्युमिन हे हळदीतील सर्वात महत्त्वाचे सक्रिय कंपाऊंड आहे, जे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. एका अभ्यासानुसार, जे लोक कर्क्यूमिनचे अधिक सेवन करतात, त्यांची फुफ्फुसे निरोगी राहतात.

टोमॅटो : जर फुफ्फुसांना आजारांपासून वाचवायचे असेल तर तुम्ही टोमॅटोचं जास्त सेवन करणे गरजेचे आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपिन नावाचा घटक आढळतो, जो कॅराटिनॉईड अँटिऑक्सिडंटचा एक प्रकार आहे. लाइकोपिन हे देखील एक संयुग आहे जे तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवते. संशोधनानुसार, जे लोक टोमॅटोचे जास्त सेवन करतात त्यांना श्वसनमार्गाशी संबंधित आजार कमी होतात. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांसाठी टोमॅटो फायदेशीर मानला जातो.

हर्बल टी : जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी चहा, कॉफीऐवजी हर्बल टी प्या. यासाठी तुम्ही आलं, हळद, लिंबू, मध आणि दालचिनी घालून हर्बल टी बनवू शकता. यामुळे तुमची फुफ्फुसे निरोगी राहतील.

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंटस् देखील आढळतात, जे तुमच्या फुफ्फुसाच्या ऊतींना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news