Pimpri News : पीएमआरडीएचा रिंगरस्ता रडतखडत | पुढारी

Pimpri News : पीएमआरडीएचा रिंगरस्ता रडतखडत

दीपेश सुराणा

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रस्ता) काम चांगलेच रेंगाळले आहे. साडेसहा वर्षांपूर्वीच या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्या सोळू ते वडगाव शिंदे या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू व्हायला आणखी चार ते सहा महिने लागणार आहेत.

कामाचे नियोजन काय ?

  •  पीएमआरडीएचा रिंगरोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सोळु येथून सुरू होणारा हा रिंग रस्ता एकूण 128 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. त्यातील परंदवाडी ते सोळू या 40 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
  • वाघोली ते लोहगाव येथील 5.70 किलोमीटर रस्त्याचे काम पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तर, पीएमआरडीएकडून एकूण 83.12 किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा रस्ता पीएमआरडीए हद्दीत सुरुवातीला 110 किलोमीटर रुंद करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे तो सध्या 65 मीटर रुंद करण्यात येणार आहे.

प्रस्तावांची जंत्री, कामाचे काय?

पीएमआरडीएने सोळू ते वडगाव शिंदे या 4.70 किलोमीटर अंतरातील रस्त्याचा भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे. सध्या हे काम मोजणी स्तरावर आहे. सल्लागारांनी सविस्तर अंदाजपत्रक सादर केले आहे. त्याची छाननी सुरू आहे. रिंग रस्त्यासाठी वन जमीन ः 46.8363 हेक्टर तर, संरक्षण खात्याची जमीन ः 7.571 हेक्टर यांच्या भूसंपादनासाठी संबंधित खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. पीएमआरडीएकडून भूसंपादनासाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे हे काम कधी सुरू होणार, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

साडेसहा वर्षांपूर्वीच प्रशासकीय मान्यता

रिंग रस्त्याच्या कामासाठी पीएमआरडीएकडून 28 डिसेंबर 2016 मध्येच 17 हजार 412 कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ही मंजुरी मिळून साडेसहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मे-2023 मध्ये त्यासाठी 14 हजार 200 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पीएमआरडीएकडून विकसित करण्यात येत असलेल्या रिंग रस्त्याचे सोळु ते वडगाव शिंदे या अंतरातील पहिल्या टप्प्याचे काम पुढील चार ते सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

– विजय कांडगावे,
कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए.

हेही वाचा

कोल्हापूर : चित्रपट महामंडळाचा खेळखंडोबा थांबणार कधी?

संपूर्ण सांगली जिल्हा दुष्काळी जाहीर करा : जयंत पाटील

वस्त्रोद्योगासाठी साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक : चंद्रकांत पाटील

Back to top button