संपूर्ण सांगली जिल्हा दुष्काळी जाहीर करा : जयंत पाटील | पुढारी

संपूर्ण सांगली जिल्हा दुष्काळी जाहीर करा : जयंत पाटील

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या निकषांमुळे सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, वाळवा , तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकर्‍यांच्यात प्रचंड असंतोष आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करावयाचे निकष तत्काळ बदलावेत आणि संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. दुष्काळ जाहीर न केल्यास शेतकर्‍यांच्यात उद्रेक होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आ. पाटील यांनी दै. पुढारीशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील फक्त मिरज, शिराळा, खानापूर, कडेगाव याच तालुक्यांचा समावेश केला आहे. यातून जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी हे दुष्काळी तालुके वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणार्‍या शेतकरी कुटुंबांची अवस्था तर बिकटच आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकर्‍यांना आधार देण्याची गरज आहे.

ते म्हणाले, जत तालुक्यातील 65 गावांना पाणीच मिळाले नाही. यावर्षी तर पाऊसच कमी असल्याने स्थिती गंभीर आहे. जतसह आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातही सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांचाही दुष्काळी तालुक्यात समावेश होणे गरजेचे आहे. दुष्काळ जाहीर करताना शासनाने जे निकष लावले, त्यामुळे हे तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट झाले नसतील. निकष बदलून संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा.

Back to top button