विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे महाडिक की आवाडे? | पुढारी

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे महाडिक की आवाडे?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

 विधान परिषद निवडणूक साठी भाजपकडून सौ. शौमिका महाडिक की राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळणार, याबद्दल जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाच्या कोअर कमिटीकडे पाठविण्यात आली आहेत. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ( विधान परिषद निवडणुक ) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत स्पष्ट झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या विरोधात भाजप निवडणूक रिंगणात उतरणार आहे. भाजपच्या वतीने उमेदवारीसाठी माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा होती.

विधान परिषद निवडणूकनियोजनाबाबत तसेच उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे यांच्यासह आ. प्रकाश आवाडेदेखील उपस्थित होते. अडीच ते तीन तास ही बैठक चालली होती. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर तसेच संख्याबळावरही चर्चा करण्यात आली. अखेर उमेदवार निवडीचे अधिकार भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना देण्याचा निर्णय घेत बैठकीचा समारोप झाला.

त्यानुसार आ. पाटील यांनी बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे उमेदवारांची नावे पक्षाच्या कोअर कमिटीकडे पाठविली आहेत. दोन दिवसांत मुंबईतून पक्षाचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

मंत्री यड्रावकर- महादेवराव महाडिक यांच्यात चर्चा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे शुक्रवारी सकाळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत अर्धा तास चर्चा केली. शिरोळ तालुक्यात 74 मते असून हे निर्णायक मतदान असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड पालिका व जिल्हा परिषद सदस्य व सभापती यांच्या मतांमुळे शिरोळ तालुक्यातून मदत करावी, अशी मागणी महाडिक यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button