सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राजारामबापू, क्रांती, विश्वास कारखान्यांची वाहने पेटवली | पुढारी

सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राजारामबापू, क्रांती, विश्वास कारखान्यांची वाहने पेटवली

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यात एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर पोहोचले आहे. स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवले. विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी आक्रमक झाली असून पालकमंत्री जयंत पाटील यांचा राजारामबापू, आमदार मानसिंगराव नाईक यांचा विश्वास, आमदार अरुण लाड यांचा क्रांती कारखान्याला त्यांनी लक्ष केले आहे.

राजारामबापू कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे पेटविण्यात आला. गुरुवारी रात्री क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे पेटविण्यात आला. विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी राजाराम बापू कारखान्याच्या ३५ वाहनाची हवा सोडण्यात आली यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली होती.

कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही? दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. सांगली जिल्ह्यात केवळ खासगी दोन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. सहकारातील १५ ते २५ वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. एकरकमी एफआरपीसाठी राजारामबापू, क्रांती आणि विश्वास हे कारखाने काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. शेतकऱ्यांचा अंत न बघता तात्काळ एकरकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा आंदोलन तीव्र करू.

– महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा : 

 

Back to top button