रस्ते कामाचे ‘वडाप’; कोल्हापूर शहरातील स्थिती : नागरिकांमध्ये संतापाची लाट | पुढारी

रस्ते कामाचे ‘वडाप’; कोल्हापूर शहरातील स्थिती : नागरिकांमध्ये संतापाची लाट

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहरातील महत्त्वाचे वर्दळीचे ठिकाण असणार्‍या सायबर चौक ते राजाराम महाविद्यालय रस्त्यावर महापालिकेकडून निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क करण्यात आले. याबाबत वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सायबर कॉलेज येथून राजाराम महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. सध्या महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांसह विद्यापीठात अनेकजण ये-जा करतात. याच परिसरात कुलगुरूंचे निवासस्थान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी खड्डे पडले होते. काही दिवसांपूर्वी महापालिकेने याची दखल घेऊन पॅचवर्क केले. परंतु; पॅचवर्क व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची महापालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.

इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनासाठी 12 केंद्रे

इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनासाठी कोल्हापूर शहरात 12 ठिकाणी स्वतंत्र संकलन केंद्रे स्थापन केली आहेत. याठिकाणी खराब संगणक, लॅपटॉप, दूरदर्शन संच, शीतकपाट (रेफ्रिजरेटर), मोबईल, चार्जर व घातक कचरा बॅटरी, सेल, एल.ई.डी. बल्ब व ट्यूब आदी ई-कचरा संकलित केला जाणार आहे. शासन निर्णयान्वये सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये संकलित होणारा ई-कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकाअंतर्गत असा कचरा संकलित करण्यासाठी नागरिकांना ठिकठिकाणी संकलन केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत.

यासाठी सर्व आरोग्य निरीक्षकांची संकलन ठिकाणी वॉर्डनिहाय नियुक्ती केलेली आहे. कपिलतीर्थ मार्केटमधील कार्यालय, संभाजीनगर फिल्टर हाऊसमधील कार्यालयात, सानेगुरूजी वसाहत येथील क्रॉ. गोविंदराव पानसरे शाळा, शाहू बँक शेजारील ताराराणी विद्यालय, शाहू क्लॉथ मार्केटमधील कार्यालय, खोलखंडोबा मंदिरजवळील पद्माराजे विद्यालय, पंचगंगा हास्पिटल येथील कार्यालय, शास्त्रीनगर ग्राऊंडजवळील फायर स्टेशन समोर, शाहूपुरीतील तात्यासाहेब मोहिते विद्यालय, कावळा नाका फायर स्टेशनसमोर, कसबा बावडा पॅव्हेलियन हॉल, महाडिक माळ कुटुंब कल्याण केंद्र क्र. 6 दवाखाना आदी ठिकाणी कचरा संकलन केले जाणार आहे.

सोमवारपासून क्षयरुग्ण शोध मोहीम

महापालिकेच्या वतीने सोमवार (दि.15) पासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत शहरातील अतिजोखमीच्या निवडक भागातील लोकांच्या घरी भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 62,500 लोकसंख्या उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 नोव्हेंबरपर्यंत मोहीम सुरू राहील. शासनाच्या सूचनेनुसार महापालिका क्षयरोग विभागाकडून अशा रुग्णांचे लवकर निदान आणि औषधोपचाराखाली आणण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी ए.एन.एम व आशा स्वयंसेविका यांची 34 पथके तयार करण्यात आलेली आहेत.

या सर्व पथकांचे संनियंत्रण वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. क्ष-किरण तपासणी शहरातील 13 खासगी डिजिटल एक्स-रे सेंटर आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. क्षयरोगाची लक्षणे असल्यास घरी येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना नागरिकांनी आपल्या आरोग्याविषयी अचूक माहिती देऊन मोफत तपासणी करून घ्यावी. तपासणीअंती क्षयरोगाचे निदान झाल्यास पुढील तपासणीसोबत औषधोपचारही पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करून क्षयरोगमुक्त कोल्हापूर मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन उपायुक्त रविकांत आडसूळ व आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले.

शहरात ठिकठिकाणी 24 डंपर खरमाती उठाव

महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी 24 डंपर खरमाती उठाव करण्यात आली. 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून मोहीम सुरू झाली.

महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी पाहणी करून कर्मचार्‍यांना सूचना केल्या. यावेळी उपशहर अभियंता एन. एस. पाटील उपस्थित होते.

आरोग्य व बांधकाम विभागाकडील कर्मचार्‍यांनी 5 डंपरच्या सहाय्याने 24 खेपांद्वारे खरमाती उठाव केला. तसेच 2 ट्रॅक्टर व 7 बैलगाड्यांद्वारे खरमाती उठाव करण्यात आली. आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली. मुख्य रस्त्यांवरील झाडे, झुडपे, गवत काढण्यात आले.

Back to top button