एनसीबी साक्षीदार किरण गोसावीचा पाय आणखी खोलात; भोसरीत गुन्हा दाखल | पुढारी

एनसीबी साक्षीदार किरण गोसावीचा पाय आणखी खोलात; भोसरीत गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी याचे कारनामे हळूहळू जगासमोर येऊ लागले आहेत. गुरुवारी (दि. ११) नोकरीच्या आमिषाने सव्वा दोन लाखांच्या फसवणूक प्रकरणी त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पुणेसह अन्य शहरांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी विजयकुमार सिद्धलिंग कानडे (३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानडे सन २०१५ मध्ये नोकरी शोधत होते. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून अर्ज केले होते. २१ मार्च २०१५ रोजी कानडे यांना एक मेल आला. यामध्ये परदेशात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी असल्याचे नमूद होते.

हेही वाचा :

दरम्यान, आरोपी किरण गोसावी याने फिर्यादी यांना संपर्क करून ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. कानडे यांचा विश्वास संपादन करून नाशिक फाटा कासारवाडी येथे भेटून ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर, फिर्यादी यांनी शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन गोसावीकडे ४० हजार रुपये दिले. तसेच, गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर फिर्यादी यांनी २० हजार रुपये पाठवले.

अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी किरण गोसावी याने फिर्यादी यांच्याकडून एकूण दोन लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button