Navratri 2023 : काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ | पुढारी

Navratri 2023 : काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

वाई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात झाली असून अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई काळूबाई देवीच्या मंदिरातदेखील घटस्थापना करण्यात आली. लखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानला रविवारी घटस्थापनेच्या दिवशी महिला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

  •  मांढरगडावर दरवर्षी नवरात्रौत्सव धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. त्यासाठी सर्व ग्रामस्थ गावातील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात एकत्र आले. तेथे शास्त्रोक्त व विधिवत पद्धतीने घटस्थापना केल्यानंतर सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने काळूबाई देवींच्या मंदिरात गेले.
  •  ग्रामस्थ, पुजारी, भाविक आणि देवस्थान ट्रस्टमार्फत शास्त्रोक्त व विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवींची महाआरती होवून नवरात्र उत्सवास खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. या देवीचे महात्म्य मोठे असल्याने येथील नवरात्रौत्सव लक्षवेधक ठरतो.
  •  नवरात्री उत्सवादरम्यान भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर होत असते. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे 61 पोलीस कर्मचारी, 40 महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान, साफ-सफाई करण्यासाठी स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांची एक तुकडी कार्यरत आहे.
  • त्यांची सर्व सोय देवस्थानमार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे प्रभारी सचिव दादा कळंबे यांच्यामार्फत देण्यात आली. येणार्‍या भाविकांसाठीदेखील प्रसादाची तसेच फराळाची सोय ट्रस्ट मार्फत करण्यात आलेली आहे.
  •  समुद्र सपाटीपासून 500 फूट उंचीवर असलेल्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाई देवीचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा जिल्ह्याच्या तसेच वाई, भोर, खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवरील शिखरावर आहे.
  • दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देवीच्या गाभार्‍याला देवस्थान ट्रस्टमार्फत फुलांची सजावट केली असून, संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

Back to top button