तुळजापूर; सतीश महामुनी : 'आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो' जयघोषामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वाद्याच्या निनादात दुपारी बारा वाजता महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथील मंदिरामध्ये विधिवत परंपरागत पद्धतीने घटस्थापना धार्मिक विधी संपन्न झाला. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री व सौ डॉ. सचिन ओंबासे यजमान होते. ( Navratri )
संबधित बातम्या
तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मध्यरात्री १ वाजता तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची मूर्ती पुजारी बांधव आणि प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. तत्पूर्वी धार्मिक विधी संपन्न झाला. देवीला भंडाऱ्याचा लेप देण्यात आला होता. पुजारी बांधवांनी आपल्या हातामध्ये उचलून शेजघरातील देवीची मूर्ती चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली. त्यानंतर पंचामृत अभिषेक करण्यात आले. स्थानिक पुजारी बांधवांच्या मनाच्या आरत्या या निमित्ताने करण्यात आल्या.
सकाळी अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर देवीचे नेते उपचार पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती आणि अंगारा काढण्यात आला. परंपरागत पद्धतीने सिंह गाभारा, यमाई मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती मंदिर येथे वैदिक मंत्र पठण करून नवरात्राचे यजमान श्री व सौ ओंबासे घटस्थापना करण्यात आली. संबळाचा निनाद आणि सनईचे सूर याप्रसंगी होते. सव्वा अकरा वाजता घटाची मिरवणूक निघाली. गोमुख तीर्थ येथून मिरवणूक काढण्यात आली. तीनही मंदिरामध्ये परंपरागत पद्धतीने घटस्थापना विधी पार पडला. याप्रसंगी धान्याचे मानकरी प्रफुल्ल कुमार शेटे यांनी पुजारी बांधव आणि भाविकांना देवीचे घट बसल्यानंतर धान्य वितरित केले.
'आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो' जयघोषामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे विश्वस्त आमदार राणा जगजीतसिंह पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, उपाध्यक्ष विपिन शिंदे, किशोर गंगणे, शिवाजी बोधले, अविनाश गंगणे, अतुल मलबा, सचिन परमेश्वर, बंडोपंत पाठक, संजय पेदे, सचिन अमृतराव, गुलचंद व्यवहारे, लखन पेंदे, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोमनाथ माळी, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, सिद्धेश्वर इनतुले यांच्यासह इतर मानकरी सेवेकरी पुजारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील ११ तासापासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली होती. रात्रभर भाविकांचा ओघ तुळजापुरात सुरू होता. हजारो भाविकांनी याप्रसंगी देवीला अभिषेक पूजा केली. कुलधर्म कुलाचार करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविकांची संख्या दिसून आली. घटस्थापनेच्या निमित्ताने महिला वर्गांनी नारंगी रंगाच्या साड्या परिधान करून देवीच्या दर्शनाला येणे पसंत केल्याचे दिसून आले.
तुळजाभवानी देवीचे दर्शन पेड पद्धतीने घेण्यासाठी मंदिर कार्यालयात खूप मोठ्या प्रमाणात व्हीआयपी जमल्यामुळे एकच गोंधळ उडाला. आणि मंदिर प्रशासनाला पेड दर्शन दोन ते अडीच तास बंद ठेवावे लागले. तुळजापूर येथे देवीचे दर्शनासाठी तीनशे रुपये आणि पाचशे रुपये असे दोन प्रकारची दर्शन पद्धत सुरू केल्यामुळे श्रीमंत भाविक भक्तांनी पास घेण्यासाठी गर्दी केली. मात्र त्याचे नियोजन कोलमडून गेल्यामुळे संस्थांना धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते दर्शन बंद ठेवण्याची वेळ आली.
पेड दर्शन पद्धतीवर सामान्य भावी भक्तांचे प्रचंड नाराजी दिसून आली. दूर दूर होऊन भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. आपला कुलधर्म कुलाचार करण्यासाठी त्यांना दोन तासापासून चार तासापर्यंत वेळ लागतो. परंतु, श्रीमंतभक्त आणि व्हीआयपी भक्ताकडून मात्र मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनच्या रांगा लावल्या जातात असे चित्र तुळजापुरात मंदिर परिसरात आहे. मंदिराला आर्थिक उत्पन्न यामधून मिळत असल्यामुळे सामान्य भाविकांची नाराजी असताना देखील मंदिर संस्थांकडून पेड दर्शन पद्धत सुरू ठेवली आहे. याचा फटका नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बसल्याचे चित्र आहे. ( Navratri )
हेही वाचा :